अशोक पाटोळे

आई रिटायर होतेय’, ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’, ‘जाऊ बाई जोरात’, ‘श्यामची मम्मी’, ‘एक चावट संध्याकाळ’ ही गाजलेली नाटकं, ‘हसरतें’, ‘श्रीमान श्रीमती’ या सुपरहिट मालिका आणि ‘चौकट राजा’, ‘झपाटलेला’ यासारखे सिनेमे आपल्या सिद्धहस्त लेखणीतून साकारणारे अशोक पाटोळे यांचे शालेय शिक्षण गिरगावातील विल्सन हायस्कूल येथे झाले. अशोक पाटोळे यांना लहानपणापासूनच लेखनाची आवड होती. त्यांचा जन्म ५ जून, १९४८ रोजी झाला.

कथाकार, नाटककार म्हणून १९७१ मध्ये त्यांनी ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’ ही पहिली एकांकिका लिहिली. त्यांनी लिहिलेली पहिली कथा ‘नवाकाळ’ या दैनिकात प्रकाशित झाली होती. पुढे ‘श्री दीपलक्ष्मी’, साप्ताहिक मार्मिक’ आदी नियतकालिकांमधून त्यांनी लिहिलेल्या विनोदी कथा प्रकाशित झाल्या होत्या.

पाटोळे यांनी लिहिलेली २० नाटके व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. ‘झोपा आता गुपचूप’ हे त्यांचे पहिले नाटक. ‘मुंबई पोर्ट ट्र्स्ट’च्या ‘एकटा जीव सदाशिव’ या नाटकात त्यांनी विनोदी नायकाची भूमिका केली होती. चित्रकला, वक्तृत्व, गीतगायन व अभिनय यांचीही पाटोळ्यांना आवड होती.

अधांतर, हद्दपार, अध्यात न मध्यात, हसरतें यांसारख्या यशस्वी दूरदर्शन मालिकांचे लेखनही त्यांनी केले होते. अशोक पाटोळे यांचे १२ मे २०१५ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*