मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत..
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत मराठी चित्रपट्सृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे खरोखर मराठीतले सुपरस्टार. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातही विविध भूमिका केल्या असून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील ‘हम पांच’ सारख्या मालिकेद्वारे त्यांचा अभिनय घराघरात पोचला आहे.
मूळचे बेळगावचे असणार्या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले.
त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ‘ ययाती आणि देवयानी ‘ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या. गजानन जागीरदार यांच्या ‘दोन्ही घरचा पाहुणा’ या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली. त्यानंतर दादा कोंडके यांच्या ‘पांडू हवालदार’ मधील इरसाल पोलिस, ‘राम राम गंगाराम’ मधील म्हमद्या खाटीक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी लीलया साकारल्या.
मराठी रसिकांच्या गळ्यातील ताईत असणार्या अशोक सराफ यांचा नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणी या त्रिस्थळी सारखाच संचार अजूनही सुरू आहे आणि प्रत्येक माध्यमात त्यांनी अभिनयाची पारितोषिके व पुरस्कार मिळविले आहेत. चित्रपटात अखंड बडबड करणारी विनोदी पात्रे साकारणारे अशोक सराफ यांचा स्वभाव मात्र शांत व केवळ मित्र-मंडळीतच मिसळणारा आहे.
Leave a Reply