राजकारण, समाजकारण, अध्यात्म, सहकार, पत्रकारिता अशा सर्व क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या बाळासाहेब भारदे यांचा जन्म २५ मे १९१४ रोजी झाला.
भारदे कुटुंब मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावचे. बाळासाहेबांचे वडील शिवरामपंत भारदे यांचा एक प्रकांड पंडित म्हणून परिसरात दबदबा होता. १९५२ साली आमदार, १९५७ साली सहकार मंत्री , १९६२ साली महाराष्ट्र विधान सभेचे सभापती व पुन्हा १९६७ साली सभापती पदी फेरनिवड अशी राजकीय कारकीर्द बाळासाहेबांची राहिली होती.
अहमदनगर जिल्हा कॉग्रेस पक्षाने १९३६मध्ये सत्याग्रहाची चळवळ जनसामान्यांपर्यत नेण्यासाठी ‘संघशक्ती’ हे साप्ताहिक सुरू केले होते. सामांन्य जनतेची गाऱ्हाणी संघशक्तीतून अग्रक्रमाने मांडली जात. संघशक्तीच्या संपादकत्वाची जबाबदारी चले जाव चळवळीतले सेनानी रावसाहेब पटवर्धन तसेच भाऊसाहेब फिरोदिया यांच्यावर होती.
या काळात अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारितेत सक्रिय असलेल्या बाळासाहेब भारदे यांच्या पुढाकाराने १९४७ मध्ये नगर जिल्हा मराठी पत्रकार संघ ही मराठी पत्रकार परिषदेची शाखा सुरू झाली.१९५१ मध्ये बाळासाहेब भारदे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतच नगरला मराठी पत्रकार परिषदेचे अकरावे अधिवेशन झाले.
मुंबईच्या अधिवेशनानंतर मात्र बाळासाहेबांचा पत्रकारितेशी फारसा संबंध राहिला नाही. कारण ते राजकाऱणात कमालीचे व्यस्त झाले. अगोदर आमदार आणि १९५७मध्ये महाराष्ट्राचे पहिले सहकार मंत्री झाले. पहिल्यांदा १९६२ व पुन्हा १९६७ असे दोन वेळा आणि सलग दहा वर्षे ते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष निवडले गेले.
अर्थपूर्ण शाब्दिक कोट्या, मर्मभेदी विवेचन, विनोदी शैली ही त्यांच्या वक्तृत्वाची काही अंगे सांगता येतील. धोतर,सदरा आणि डोक्यावर गांधी टोपी घातलेले भारदे बुवा राजकारणातील संत म्हणूनच ओळखले जायचे. राजकारण, अध्यात्म, समाजकारणकिंवा सहकार आणि पत्रकारिता या सर्वच क्षेत्रांत त्यांनी आपल्या कार्याचा आणि विचारांचा ठसा उमटविला. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले.
भारत सरकारने बाळासाहेब भारदे यांना २००१ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता.
बाळासाहेब भारदे यांचे २२ नोव्हेंबर २००६ रोजी निधन झाले.
Leave a Reply