बोरकर, बाळकृष्ण भगवंत (बा. भ. बोरकर)

बा. भ. बोरकर म्हणजेच बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचा जन्म इ.स. १९१० मध्ये गोव्यातील कुडचडे गावी झाला. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर गोव्यातील शाळेत त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला. पण पुढे त्यांची आकाशवाणीत अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.

बा. भ. बोरकर यांनी एक प्रसिध्द प्रतिभावंत कवी म्हणून ख्याती मिळवली. निसर्ग आणि स्त्री-सौंदर्य यासंबंधीच्या विविध अनुभवांचा प्रत्ययकारी आविष्कार त्यांच्या काव्यातून घडतो. ‘प्रतिभा’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रसिध्द झाले. काव्याप्रमाणेच कादंबर्‍या आणि लघुकथाही त्यांनी लिहिल्या.
कोकणी भाषा हा बोरकरांचा अस्मितेचा आणखी एक विषय होता. त्यांनी कोकणी भाषेतूनही लिखाण केले. कोकणीला स्वतंत्र भाषेचा दर्जा मिळावा, असा त्यांचा आग्रह होता.
गोवा मुक्ती आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता. बोरकरांना गोव्याविषयी आत्यंतिक प्रेम होते. हे, ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’ या कवितेतून व्यक्त होते,
माझ्या गोव्याच्या भूमीत
गड्या नारळ मधाचे
कड्या कपारी मधोनी
घट फुटती दुधाचे
मराठीतील ‘आमचा गोमंतक’ आणि कोकणातील ‘पोर्जेचो आवाज’ या वृत्तपत्रांचे संपादक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले होते.
त्यांचे काही काव्यसंग्रह पुढीलप्रमाणे:
प्रतिभा, आनंदभैरवी, चित्रवीणा, चिन्मयी, गितार, चैत्रपुनव, जीवनसंगीत, कांचनसंध्या, दूधसागर इत्यादी
कादंबर्‍या:
भाविक, प्रियकामा इत्यादी
त्यांच्या काही काव्यसंग्रहांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली आहेत. भारत सरकारने ‘पद्मश्री’ हा किताब देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला.
बा. भ. बोरकर यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.

1 Comment on बोरकर, बाळकृष्ण भगवंत (बा. भ. बोरकर)

Leave a Reply

Your email address will not be published.


*