गांगल, भगवंत

भगवंत गांगल यांचे लेखन हे सहजस्फुर्तीमधून जन्माला आले. लेखनीक व्हायचे या आकांक्षेने ते कधीच जगले नसल्यामुळे, त्यांची लेखणी ही व्यावसायिक ध्येयाने कधीच मुहूर्तरूपात उमटली नाही. त्यात सफाईदारणा किंवा आभ्यासपूर्ण लिखाणामुळे जमून आलेली खमंग फोडणी नव्हती, परंतु मानवी स्वभावाच्या विवीध कडांच्या अचूक चित्रणामुळे, ती रसिकांच्या मनाला मात्र चांगलीच भावली. कथा व कादंबरी या दोन वाचकप्रिय प्रकारांना आपलेसे करून त्यांनी पहिल्यांदा हातात लेखणी धरली होती. त्यातून मध्यमवर्गीयांच्या भावना व मनोजीवनाचे हुबेहूब चित्रण करण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. नव्या व काहीश्या अपारंपारिक, विचारांची कुपी पहिल्यांदा आपल्या साहित्यातून वाचकांपर्यंत पोहोचवणारे लेखक ही ओळख त्यांना अल्पावधीत मिळाली. नव्या पिढीचे स्पष्ट विचार, पारदर्शीपणे तिच्या तत्वांचा, स्वप्नांचा व आकांक्षाचा आपल्या साहित्यामधून केलेला जिवंत उहापोह, ही खरं तर त्या काळामध्ये त्यांनी उचललेली धाडसी पाऊले होती. त्यामुळे त्यांचे साहित्य हे कर्मठ व सनातनी लोकांच्या पचनी पडलेले नसले, तरी तरूणांनी त्यांच्या साहित्याची पताका नेहमी उंचावरच फडकवत ठेवली.

क्षणचित्रे (१९३८), शल्ये (१९४४), आसवांची माळ (१९३४), पिंजर्‍यातील पक्षी (१९३८), पाझर (१९४०), रंगाचे घर (१९४४) या कादंबर्‍यांद्वारे त्यांनी मनुष्यस्वभावाच्या विविधांगी पैलुंचा, त्यांना झालेला साक्षात्कार कलात्मकरितीने रसिकांसमोर मांडला. हे सर्व रसिकांना पटवून देण्यासाठी त्यांनी, अनेक रोचक पात्रांचा व उत्कंठावर्धक परिस्थितींचा परस्परसंबंध मोठया कुशलपणे गुंफला. समाजात आपण पाहिलेले, ऐकलेले, अनुभवलेले, नजरेस पडलेले सांस्कृतिक व नागरी जीवन संक्षिप्तरूपात चितारण्याच्या एकाच ध्येयाने, त्यांनी विपुल लेखन केले. हे ध्येय त्यांच्या साहित्याने काही प्रमाणात पुर्ण केले हे नक्की सांगता येईल. गांगलांनी त्यांच्या अनेक कथांमधून, त्या काळानुरूप विस्फोटक असलेल्या सामाजिक गोष्टींवर बिनधास्त मते नोंदवली. जसे- अधोगती की उध्दार या कथेमध्ये विधवाविवाहाची उपयुक्तता रसिकांमनावर बिंबवण्यासाठी, त्यांनी एक अप्रतिम व ओघवता कथासाचा निर्माण केला होता. आसवांची माळ या कथेतून त्यांनी प्रेमविवाहाचा जाज्वल्य पुरस्कार केला. मनाविरूध्द विवाह घडावून आणल्याने भविष्यात कोणते भीषण परिणाम होऊ शकतात, व प्रत्येक व्यक्तीला इमानाने आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार न दिल्याने कोणती परिस्थिती उद्भवु शकते, हे रसिकांना ह्या कादंबरीने प्रभावीपणे पटवून दिले होते. ही कादंबरी देखील भरपुर वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे नव्या जाणीवेने केलेले स्पष्टवक्ते लेखन हा त्यांच्या कथेचा आत्मा होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आसवांची माळ या कादंबरीचा अपवाद सोडला तर पुढील लेखनात त्यांनी साध्या साध्या अर्थपूर्ण प्रसंगांतून घरगुती जिव्हाळ्याचे वातावरण तयार केले. पात्रांच्या वास्तव आणि मनोजीवनाचे धागे एकमेकांमध्ये, कौशल्यपुर्ण प्रसंग रचनेच्या व लक्षवेधी संवादांच्या साहाय्याने गुंतवून, वाचकांना त्या पात्राच्या भावविश्वामध्ये गुंगवून ठेवण्याचे कसब त्यांनी चांगलेच अवगत केले होते.

दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*