बी. जी. देशमुखांची गणती भारताच्या राजकीय पटलावरील सर्वपरिचीत व अनुभवी व्यक्तीमत्वांमधील, रूबाबदार व तडफदार अधिकार्यांमध्ये होते. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये त्यांनी भारतातील राजकीय वळणांची वाटचाल जवळून पाहिली होती, व राजकीयदृष्ट्या ऐतिहासिक असलेल्या एका कालखंडाचे ते प्रत्यक्ष साक्षीदार देखील होते. देशमुख यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, तसेच केंद्रिय मंत्रिमंडळात विवीध खात्यांचे प्रमुख म्हणून पदे भुषविली. राजीव गांधी, व्ही. पी. सिंग व चंद्रशेखर हे पंतप्रधान असताना ते पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान सचिव होते. त्यामुळे देशमुखांचा या तिघांशीही जवळचा संपर्क आला होता. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणातील विवीध दिग्गज नेत्यांशीही त्यांचा चांगला संपर्क होता. त्यांनी आपली कार्यशैली व गुणवत्तेच्या बळावर प्रशासकीय सेवेवर ठसा उमटविला होता. निवृत्तीनंतर सामाजिक व नागरी हक्काच्या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. पर्यावरणविषयक बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, उद्योग व शेतीविषयक मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरची जनवाणी ही संस्था, के. ई. एम. रूग्णालय, पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईन्ड अशा विवीध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून समाजपयोगी कार्य केले. तसेच टाटा सन्स लिमीटेड, टीस, टाटा हाउसिंग डेव्हलपमेंट कॉलनी, फिनोलेक्स केबल, आय. डी. बी. आय. म्युच्युअल फंड, अशा अनेक आर्थिक व औद्योगिक संस्थांच्या संचालक मंडळांवर त्यांनी काम केले आहे. याचबरोबर देशमुख यांनी आपली सेवा व अनुभवांवर आधारित अनेक संस्मरणीय पुस्तके लिहीली आहेत. त्यात ‘ ए कॅबिनेट सेक्रेटरी लुक्स अराऊंड, ‘पुना टू प्राईम मिनिस्टर्स ऑफिस- ए कॅबिनेट सेक्रेटरी लुक्स बॅक’ अशी विवीध पुस्तके लिहीली आहेत.
Leave a Reply