विनोदी अभिनेते भालचंद्र पांडुरंग कदम उर्फ भाऊ कदम यांचा जन्म ३ मार्च १९७० रोजी मुंबई येथे झाला.
मराठीत अनेक विनोदवीर आहेत. मात्र या सर्वांमध्ये सर्वात जास्त क्रेझ दिसून येते भाऊ अर्थातच भालचंद्र कदम या अभिनेत्याची. भाऊ यांनी आपल्या धमाल कॉमेडीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये झळकणाऱ्या भोळ्या भाऊ कदम यांनी आपल्या विनोदी टायमिंगने महाराष्ट्राला पोट धरुन हसायला भाग पाडले आहे. खरं तर भाऊ यांना खरी ओळख मिळवून दिली ती झी मराठी वाहिनीच्या ‘फू बाई फू’ या कार्यक्रमाने.
बालपणापासूनच त्यांना त्यांच्या घरचे सर्व भाऊ म्हणून हाक मारतात. वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयातून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. बालपणापासूनच ते लाजाळू आणि शांत स्वभावाचे आहेत. वडाळा परिसरातील बीपीटी क्वॉटर्समध्ये त्यांचे बालपण गेले. वडील हयात असेपर्यंत घराची जबाबदारी त्यांच्यावर नव्हती.
बालपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या भाऊ यांना वर्षातून, सहा महिन्यातून एखादे नाटक मिळत असे. त्यांनी कॉम्प्युटर कोर्स केला होता. त्यामुळे कुटुंबाचे संगोपन करण्यासाठी त्यांनी सुरुवातीच्या काळात काही कार्यालयांत कारकुनीचे काम ते निवडणुकीच्या काळात मतदारांची नावे नोंदवणे, अशी कामे केली.
विजय निकम यांच्या ‘एवढाच ना’ या नाटकाद्वारे त्यांना पहिला कमर्शिअल ब्रेक मिळाला. या नाटकात त्यांनी शॉर्ट टर्म मेमरी लॉस असलेल्या व्यक्तीची भूमिका वठवली होती. पंधरा वर्षांत भाऊ यांनी जवळजवळ ५०० हून अधिक नाटकांमध्ये अभिनय केला आहे. खरं तर करिअरमध्ये मोठी संधी मिळत नसल्याचे पाहून त्यांनी अभिनयाला रामराम ठोकण्याचाही विचार केला होता. मात्र त्याचकाळात विजय निकम यांनी त्यांना ‘जाऊ तिथे खाऊ’ या नाटकात मुख्य भूमिका दिली. हे नाटक त्यांच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरले.
मराठी मध्ये होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमांत भाऊ असायलाच पाहिजे तर कॉमेडी पूर्णत्वाला गेल्यासारखी वाटतें आणि म्हणून होणाऱ्या प्रत्येक अवार्ड शो मध्ये भाऊ च्या बतावण्या ऐकुन प्रेक्षक ही पोट धरून हसताना आपल्याला दिसतात.
Leave a Reply