भाऊ पाध्ये यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९२६ रोजी दादर येथे झाला.
भाऊ पाध्ये यांचे लेखन थेट वास्तवाला भिडणारे असे. मुंबईतील संक्रमणकाळ त्यांच्या लेखणीने नेमकेपणाने व बारकाव्यानिशी टिपला होता.
भाऊ पाध्ये यांचं पूर्ण नाव प्रभाकर नारायण पाध्ये. मुंबई विद्यापीठातून १९४८ साली त्यांनी अर्थशास्त्र घेऊन पदवी मिळवली. १९४९ ते ५१ या काळात ते कामगार संघटनेचे पूर्ण वेळ कार्यकर्ते होते. नंतर किंग जॉर्ज हायस्कूल , एल कदूरी हायस्कूल आणि बी. एस. इझिकेल हायस्कूल ), येथे शिक्षकाची नोकरी केली. पुढे स्प्रिंग मिल येथे ४ वर्षं आणि आयुर्विमा महामंडळ येथे ४ महिने कारकुनी केली.
‘हिंद मझदूर’, ‘नवाकाळ’ (१ वर्ष), ‘नवशक्ति’ (११ वर्षं) या नियतकालिकांतून पत्रकारिता. ‘नवशक्ती’ सोडल्यावर काही काळ ‘झूम’ या सिने-साप्ताहिकाचे संपादन. ‘रहस्यरंजन’, ‘अभिरुची’, ‘माणूस’, ‘सोबत’, ‘दिनांक’, ‘क्रीडांगण’, ‘चंद्रयुग’ या नियतकालिकांतून स्तंभलेखन केले. सोबत मध्ये पिचकारी नावाचे सादर लिहित असत. भाऊ पाध्ये यांनी ‘वासूनाका, अग्रेसर, राडा’ डोंबाऱ्याचा खेळ या कादंबऱ्या लिहिल्या.
शिवसेनेचा अजेंडा मराठी मनाला भुरळ घालणारा होता. त्यामुळे महानगरीय वातावरणात मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले जाणाऱ्या मराठी तरूणांना शिवसेना हे हक्काचे व्यासपीठ मिळाले. त्यामुळे शिवसेनेचा झपाट्याने विस्तार झाला. कामगार संघटनांतून कम्युनिस्टांची हकालपट्टी करून सेनेने मराठी ताकद आपल्या पाठीशी उभी केली. ‘राडा’ मध्ये ही सारी पार्श्वभूमी येते.
दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी ’भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा – कथा/लेख/भाषणं’ या नावाने आणि राजन गवस यांनी ’भाऊ पाध्ये यांची कथा’ या नावाने पाध्यांच्या कथांचा संग्रह संपादित केला आहे. राजन गवस यांनी पाध्ये यांच्या साहित्यावर पीएच. डी. केलेली आहे.
भाऊ पाध्ये यांचे ‘करंटा’ (१९६१), ‘वैतागवाडी’ (१९६४), ‘वासूनाका’ (१९६५), ‘डोंबाऱ्याचा खेळ’ (१९६७), ‘अग्रेसर’ (१९६८), ‘होमसिक ब्रिगेड’ (१९७४), ‘राडा’ (१९७५), ‘वणवा’ (१९७८), ‘वॉर्ड नं. सात सर्जिकल’ (१९८०), ‘जेलबर्ड्स’ (१९८२) या कादंबऱ्या आणि ‘एक सुन्हेरा ख्वाब’ (१९८०), ‘मुरगी’ (१९८१), ‘थालीपीठ’ (१९८४), ‘थोडी सी जो पी ली’ (१९८६), ‘दावेदार’ (१९९२) हे कथासंग्रह उपलब्ध आहेत.
भाऊ पाध्ये यांचे निधन ३० ऑक्टोबर १९९६ रोजी झाले.
Leave a Reply