पुण्यातील एक यशस्वी मराठी उद्योजक व ‘चितळे बंधू मिठाईवाले’चे संस्थापक रघुनाथराव ऊर्फ भाऊसाहेब चितळे यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९२० रोजी झाला.
चितळे कुटुंबीय मूळचे भिलवडी (जि. सांगली) येथील. भास्कर चितळे यांनी १९२० मध्ये सातारा जिल्ह्य़ातील लिंबगोवे या छोटय़ाश्या खेडय़ात दूध विक्रीचा व्यवसाय सुरू केला. सात भाऊ आणि पाच बहिणी अशा चितळे यांच्या कुटुंबातील भाऊसाहेब हे ज्येष्ठ असल्याने वडिलांच्यापश्चात तेच आधारस्तंभ झाले. वयाच्या १८ व्या वर्षी शिक्षण पूर्ण करून त्यांनी वडिलांसोबत दुग्धव्यवसायात पदार्पण केले.
दुधाच्या घरगुती व्यवसायाचे मोठय़ा व्यवसायामध्ये रुपांतर करण्यामध्ये रघुनाथरावांचे योगदान आहे. पुण्यामध्ये तीन लाख लिटर म्हशीच्या आणि एक लाख लिटर गाईच्या दुधाच्या पिशव्या विकल्या जातात. त्याचप्रमाणे पाच हजार लिटर सुटं दूध विकले जाते.
बाकरवडी हा पदार्थ खरतर विदर्भ आणि गुजरातमधील. विदर्भात ही तयार करुन लगेच खाण्यासाठी बनते तर गुजराथी बाकरवडी आठ दिवस टिकते. ज्यांच्या बाकरवडीनं जगभरातील खवय्यांना बोटं तोंडात घालायला लावली, त्या ‘चितळे बंधू मिठाईवाले’चे संस्थापक भाऊसाहेब चितळे यांनी सुरत शहरात हा पदार्थ बघितला.
हॉलंडमधील एका कंपनीने तयार केलेल्या मशीनवर सन १९९२ ते १९९६ या काळात अनेक प्रयोग करुन बाकर वडी यशस्वीपणे तयार झाली. तमाम पुणेकरांच्या, महाराष्ट्राच्या इतकेच नव्हे तर जगातील सर्व बाकरवडीच्या चाहत्यांना हा पदार्थ मिळावा यासाठी भाऊसाहेब आणि राजाभाऊ चितळे या दोघा बंधुंचे प्रयत्न कामी आले.
बाकरवडी बरोबरच पेढे, गुलाबजाम यांनाही मोठी मागणी असून, आज देशातच नव्हे तर परदेशातही त्यांचे पदार्थ चवीने खाल्ले जातात. समाजाला परत काहीतरी देणे, हा चितळे बंधूंचा गुणधर्मच होता. त्यामुळेच त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला होता. त्यातूनच महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, जोशी हॉस्पिटल आपत्तीतही त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला.
पदार्थांची गुणवत्ता आणि चव यांना सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या दुकानाला टाइम्स ग्रुपतर्फे सलग तीन वेळ बेस्ट मिठाई शॉप ऍवॉर्ड मिळाला. उत्तम निर्मिती करुन भागणार नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी वेगळे पॅकेजिंग हवे आणि वेगळे वितरण हवे, हेही भाऊसाहेब चितळे यांनी जाणले. त्यासाठी त्यांनी चितळेची उत्पादने महाराष्ट्रभर मिळतील, अशी यंत्रणा उभी केली.
रघुनाथराव ऊर्फ भाऊसाहेब चितळे यांचे २० मार्च २०१६ रोजी निधन झाले.
Leave a Reply