श्री गोंदवलेकर महाराजांचा जन्म माघ शुध्द द्वादशी शके १७६६ (इ.स. १८४५) या दिवशी गोंदवले येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नांव रावजीपंत व आईचे नांव सौ. गीताबाई असे होते. महाराजांचे नांव गणपती ठेवले गेले.
गुरुकृपा झाल्यानंतर तुकामाईंनी यांचे नाव ब्रम्हचैतन्य असे ठेवले. तुकामाईंनी श्री महाराजांना रामोपासना करावी असे सांगून रामदासी दीक्षा दिली. त्याचबरोबर प्रापंचिक लोकांना विशेषतः मध्यम स्थितीतील लोकांना आपल्या प्रपंचामध्येच परमार्थ कसा करावा हे शिकवण्यास सांगितले. रामनामाचा प्रसार करणे, दीनदुबळ्यांची सेवा करणे, सर्वत्र प्रेम वाढेल हे पाहाणे, लोकांमध्ये भजनाची आवड निर्माण होईल हे पाहाणे याही गोष्टी करायला सांगितल्या.
श्री महाराजांनी उर्वरीत सर्व आयुष्य गुरुच्या आज्ञेचे पालन करण्यात घालविले. त्यांनी दोन तीन वेळा भारतभ्रमण केले. बर्याच ठिकाणी राममंदिरांची स्थापना केली. त्यामुळे बर्याच प्रांतात त्यांचा शिष्यपरीवार आढळतो.
आपल्याकडे येणार्या प्रत्येक माणसाला प्रपंच करुन परमार्थ कसा साधता येतो हेच त्यांनी सांगितले. भगवंताच्या सगुण भक्तीच्या द्वारेच त्याचे निर्गुण स्वरुप ज्ञात होते आणि सगुण भक्तीचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण असे ते वारंवार सांगत. व्यावहारिक कर्मे करावीत पण भगवंतासाठी करतो ही बुध्दी ठेवावी म्हणजे मग तुमची प्रत्येक कृती त्याची सेवा होईल असे त्यांचे सांगणे होते. प्रपंच आणि परमार्थ एकमेकापासुन वेगळे होऊ शकत नाहीत कारण जीवन सलग आहे. उपास न करता उपासना करा त्याला जास्त महत्व आहे हेही ते आवर्जून सांगत.
या महापुरुषाने मार्गशीर्ष वद्य दशमी शके १८३५ रोजी देह ठेवला. दत्तजयंतीचे दुसरे दिवशीपासून दशमीपर्यंत दरवर्षी गोंदवले येथे उत्सव असतो.
गोंदवले बुद्रुक (ता. माण, जि. सातारा) येथे श्रीमहाराजांचे समाधिमंदिर असून तेथे भक्तांसाठी निवास, प्रसाद वगैरेची व्यवस्था विनामूल्य आहे. त्याचबरोबर हॉस्पीटल, रोपवाटिका, संस्कृत पाठशाळा हेही उपक्रम संस्थानातर्फे राबविले जातात.
Leave a Reply