चंद्रकांत केळकरांचा पेशा शिक्षकाचा असला तरी, त्यांचा पिंड सक्रिय कार्यकर्त्याचा राहिलेला आहे. गेली तीस-चाळीस वर्षे त्यांनी केलेलं परिवर्तनाच्या चळवळीतील लिखाण, संघटन कौशल्य, चळवळीतील कृतिशीलता अशा चौफेर वाटचालीची दखल घ्यायलाच हवी .
केळकरांनी तीस वर्षांहून अधिक काळ अर्थशास्त्राची प्राध्यापकी केली. मिठीबाई कॉलेजचं प्राचार्यपद त्यांनी भूषवलं. विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम अखंड सुरू असतानाच त्यांनी सी. बी. पटेल रिसर्च सेंटर या पदव्युत्तर संशोधन संस्थेच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला. ही संस्था आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावी यासाठी ८०-९० लाखांपर्यंत निधीची उभारणी करून दिली.
परिवर्तनाच्या चळवळीतील अनेक सामाजिक संस्था-संघटनांशी त्यांचा संबंध येत राहिला. अनेक वर्षे ते केशव गोरे ट्रस्टशीही ते जोडले गेले होते. अशा अनेक जबाबदार्या सांभाळत असतानादेखील केळकरांनी झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेचा पायाभूत अभ्यास आणि इंग्रजी भाषेतील संवादकौशल्य यावर अभ्यासक्रम तयार केले. निव्वळ भाषेच्या अभावी बिचकणयार्या अनेक मुलांना हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरले आहेत. विविध शिक्षण संस्थांच्या उभारणीत केळकरांचा हातभार लागलेला आहे. सामाजिक चळवळीतील सक्रियता आणि अर्थशास्त्राचा अभ्यास यामुळे जगभरात होत असलेले आर्थिक आणि सामाजिक बदल हे केळकरांना अधिक डोळसपणे पाहता आले व त्यांचे विस्तृतपणे विश्लेषण करता आले.
गेल्या २० वर्षांत जागतिकीकरणामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेतही मोठे स्थित्यंतर झाले. त्याच्या विविध अंगी परिणामांवर दोन मौलिक ग्रंथ केळकर यांनी लिहिले आहेत. ‘नाणेनिधी व जागतिक बँक यांचा नववसाहतवाद’ आणि ‘दुसरे जग शक्य आहे- पर्यायी लोकवादी व्यवस्था’ या दोन आर्थिक विवेचन करणार्या पुस्तकांतून नवभांडवलवादावर प्रखर टिपणी केली आहे. नाणेनिधी व जागतिक बँक यांची धोरणे, विकसित देशांना कर्ज देण्यासाठीच्या जाचक अटी, त्यातून विकसनशील देशांची होणारी कोंडी याचा परामर्श केळकरांनी घेतला आहे. कुठल्याही देशाच्या विकासात सम्यक वितरणाची गरज असते, तरच विकासाची फळे जनसामान्यांपर्यंत पोहोचतात. पण नव्या भांडवली व्यवस्थेत सम्यक वितरणाचाच अभाव आहे, असे असेल तर त्यातून विकसित देशांचा योग्य विकास होणार नाही, अशी मांडणी केळकरांनी पहिल्या पुस्तकात केली आहे. पण, नुसतीच टीका करण्यातून काही हासिल होत नाही, विकासाचे पर्यायही सुचवावे लागतात. दुसर्या पुस्तकात त्यांनी तशी मांडणी केली आहे.
केळकरांनी दर्डा फौंडेशनच्या माध्यमातून कोकणात संगमेश्वरजवळ धामणी गाव दत्तक प्रकल्पही राबवला आहे. तिथे आरोग्य, शिक्षण, पाणी यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केळकर व्यक्तीश: प्रयत्नशील राहिले आहेत.
Leave a Reply