फक्त दूरदर्शन होते, चॅनल्सचा सुळसुळाट नव्हता तेव्हा टीव्हीवर चमकणार्या प्रत्येक चेहर्याला ग्लॅमर होते. अनेक प्रेक्षक, तेव्हा दर्शकही बनले नव्हते. आपला आवडता चेहरा आज दिसणार आहे की याची चौकशी दूरध्वनीवरून करत. अर्थात, यात चारूशीला पटवर्धन हे नाव ‘बेस्ट थ्री’मध्ये होते.
मुंबई दूरदर्शन सुरू झाल्यावर ज्यावेळी मराठीतून बातम्या प्रसारण करण्याचा निर्णय झाला त्यावेळेपासून पटवर्धन बातम्या देत असत. दूरदर्शनवरील मराठी बातम्यांना २५ वर्षे पूर्ण झाली त्यादिवशी बातम्या देण्यासाठी त्यांना मुद्दामहून पाचारण करण्यात आले होते.
अत्यंत देखणा, सोज्ज्वळ चेहरा, गोड हसणे आणि प्रत्येक शब्दाचा स्पष्ट उच्चार (आणि अगदी माशी उडवण्यातील सहजताही) यामुळे त्यांची लोकप्रियता अफाट होती आणि निवेदिका ते वृत्तनिवेदिका हा प्रवास त्यांनी सहजतेने केला. खरे म्हणजे, चांगली निवेदिका ही चांगली वृत्तनिवेदिका ठरतेच असे नव्हे. पटवर्धन याला अपवाद ठरल्या. याला मुख्य कारण म्हणजे त्यांना असलेली बातमीची उत्तम समज. प्रेक्षकाला, वृत्तनिवेदक आपल्याला बातमी सांगतो आहे; असे वाटणे हे वृत्तनिवेदकाचे यश असते. ते त्यांच्यात होते. मुख्य म्हणजे, त्या काळात तंत्रज्ञानाच्या मर्यादेमुळे, कागदावरची बातमी वाचून दाखवावी लागे. तरीही विशिष्ट क्षणी, प्रेक्षकांकडे थेट बघण्याचे असे कौशल्य आत्मसात करावे लागे. मग ती बातमी वाचलेली नाही तर आपल्याशीच संवाद साधणारी आहे असे प्रेक्षकांना वाटे. हे कौशल्य चारूशीला यांनी पुरेपूर आत्मसात केले होते.
विशी गाठायच्या आता लग्न आणि संसार सुरू करणार्या त्यांनी नंतर ‘दूरदर्शन’वर अनेक वर्षे काम केले. त्या काळात, ज्योत्स्ना किरपेकर, भक्ती बर्वे, स्मिता तळवलकर, स्मिता पाटील अशा अनेक वृत्तनिवेदिकांवर प्रेक्षक फिदा होते. यातल्या चारूशीलाचे वैशिष्टय म्हणजे, एखादी दु:खद बातमी वाचण्याची सुरूवात करताना त्या स्वर इतक्या सहज बदलायची की पाहणाऱ्याला लगेच कळायचे की कोणाच्या तरी निधनाची बातमी त्या देणार आहेत. त्यामुळे प्रेक्षक त्यांना मनोमन दादही देत. पुन्हा पुढची बातमी वाचत ना त्या नेहमीच्या पट्टीत यायच्या.
अर्थात, इतक्यावर त्या समाधानी नसत. त्यावेळी मालिकांचा जमाना सुरू झाला होता. अवंतिका, स्वामी अशा मालिकांतूनही त्यांनी लीलया अभिनयाचे आव्हान स्वीकारले. शिवाय अनेक जाहिरातींनाही त्या आवडीने आवाज देत. राज्य सरकारच्या अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही त्यांचेच असे. कपिलदेव निखंजच्या संघाने १९८३ साली विश्वचषक जिंकल्यावर मुंबईत संघाचा जंगी सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची कामगिरी त्यांनी समारंभाची शोभा वाढेल इतकी उत्तम बजावली.
गेली काही वर्षे त्या खऱ्याखुऱ्या आजीची भूमिका करण्यात रमल्या होत्या. आपण निवृत्त कधी व्हायचे, याचे भान त्यांना होते. प्रेक्षकांनी, तुम्ही कधी निवृत्त होणार असा प्रश्न विचारण्याची संधी त्यांनी दिली नाही.
त्यांनी वयाच्या ६७व्या वर्षी कायमची निवृत्ती घेतली.
Leave a Reply