संभाजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते.
जानेवारी १६८१ मध्ये संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजीराजांविरूध्द कट केला आणि त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्यांना हत्तीच्या पायी देऊन मारले.
औरंगजेबाने १६८२ मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. त्याचे सैन्य स्वराज्याच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर त्याचे राज्य स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. जगातीला सर्वात शक्तीशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली मराठयांनी हिमतीने लढा दिला. मराठयांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा! औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठयांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरूध्द औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. यांपैकी कोणत्याही शत्रूचा पूर्णपणे बिमोड करणे संभाजीराजांना शक्य झाले नाही. पण त्यापैकी कोणीही त्यांच्याविरूध्द उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेत्रुत्वाखाली मराठयांनी सर्व शत्रुंशी एकहाती झुंज दिली.
१६८७-८८ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. त्यामुळे परिस्थिती कठीण झाली. त्यातच संभाजीराजांच्या पाठीत खंजीर खुपसायला अनेक फितुर सदैव तत्पर होते. संभाजीराजांच्या दुर्दैवाने त्यांचे सख्खे मेहुणे गणोजी शिर्के, महादजी निंबाळकर आणि हरजीराजे महाडिक काही गावांच्या वतनासाठी शत्रूला सामील झाले.
मार्च ११,१६८९ रोजी संभाजीराजांची शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली.