विख्यात नट, वृत्तपत्रलेखक, आत्मचरित्रलेखक आणि म्हणून प्रसिद्ध असलेले मागील पिढीतले एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व चितामणराव कोल्हटकर. यांचे मूळ घराणे नेवरे या रत्नागिरी जिल्ह्यातील गावचे. १२ मार्च १८९१ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हे वर्तमानपत्र लेखक आणि उत्कृष्ट वक्ते होते. चिंतामणरावांच्या वयाच्या सातव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे चितामणरावांच्या शिक्षणाची आबाळच झाली. अभ्यास पुढे सरकेना. तेव्हा काही वर्षे त्यांनी पिढीजात शेतीचा व्यवसाय करून पाहिला. पण त्यांना नाटकं वाचण्याची आणि करण्याची अतिशय आवड होती. त्यामुळे १९११ साली महाराष्ट्र नाटक मंडळीत त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी नाट्यक्षेत्रात अनेक विविध भूमिका पार पाडल्या. अगदी होतकरू नटापासून सुरुवात करून मग प्रमुख भूमिका नंतर बलवंत नाटक मंडळीतला प्रवेश इथपासून ते स्वतःच्या मालकीच्या ललित कलाकुंज या संस्थेद्वारा केलेली रंगभूमीची सेवा हा सर्व प्रवास त्यांनी अत्यंत परिश्रमाने आणि ध्येयाने केला. त्यांनी लिहिलेल्या ‘बहुरुपी’ या त्यांच्या आत्मचरित्रात या वाटेवरील लिहिलेल्या घटना वाचून त्यांच्या नाट्यजीवनातील अनुभव हे प्रेरणादायी वाटतात. चितामणराव कोल्हटकर हे नाव म्हणजे त्या काळी नाट्यक्षेत्रातील एक दबदबा होता.
Leave a Reply