“बडबड नको कृती हवी” ही म्हण तर आपल्या सर्वांना परिचीत आहेच. परंतु ही म्हण दुरदूरच्या आदिवासी पाड्यांच्या नसानसांत भिनवून, व शिक्षणाचे सार्मथ्यशाली वारे खेड्यापाड्यांमधील आदिवासी लोकांपर्यंत पोहचवून त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे असामान्य कार्य तपस्वी केशव गोविंद तथा दादासाहेब लिमये यांनी पाली येथे केले.
दादासाहेबांचा जन्म पाली येथे २८ नोव्हेंबर १९०९ रोजी झाला. बालपणापासूनच त्यांना खेळ व व्यायामाची प्रचंड आवड होती. पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ते शिक्षण क्षेत्रात उतरले होते. ते काँग्रेसचे सदस्य होते पण त्यांचा ओढा राजकारणाऐवजी शिक्षण व समाजकार्याकडे होता. तरीही त्यांनी १९६२ ते १९६७ या काळात कुलाबा (आताचा रायगड) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होते. या काळात त्यांनी जिल्ह्यातील गोरगरीब, आदिवासी, कातकरी व दलित समाजातील मुलांची हालाखी बघून त्यांच्या उज्वल भविष्यांसाठी शिक्षण संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला.
पालीनजीकच्या वावळोली या गावात त्यांनी या समाजाच्या मुलांसाठी आश्रमशाळा सुरू केली. शाळेसाठी जागा व सरकारचे अनुदान मिळवले व साधीच का होईना पण इमारत उभी केली. आजवर हजारो आदिवासी होतकरू विद्यार्थी या शाळेतून शिक्षण घेऊन सन्मानित आयुष्य जगण्यासाठी बाहेर पडले आहेत. या विद्यार्थ्यांना कारकुनीचे शिक्षण देण्याऐवजी शेतीचे शास्त्रोक्त शिक्षण देण्याकडे त्यांचा कल होता.
१९४१ मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या सुधागड एज्युकेशन सोसायटीमार्फत त्यांनी रायगड जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात सुमारे ६० शिक्षण संस्था स्थापन केल्या. १९३० मध्ये हरिजन सेवक संघाची स्थापना झाल्यानंतर ते अस्पृश्यता निवारण चळवळीत उतरले. त्यांनी महाडमध्ये पाणी सत्याग्रहात भाग घेतला व आपल्या ब्राम्हण समाजाचा रोष पत्करून त्यांनी त्यांची विहीर हरिजनांसाठी खुली केली. भारताच्या स्वातंत्र्याचा मुहूर्त साधून १५ ऑगस्ट १९४७ रोजी त्यांनी वाजंत्री लावून पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात हरिजनांसह प्रवेश केला. त्यांच्या या कार्याचा ‘दलित मित्र’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
दादासाहेब केवळ समाजकार्यच करून थांबले नाहीत तर त्यांनी उद्योगधंद्यांनाही चालना दिली. सहकारी तत्वावरील सुधागड ग्रेन कंपनी, पालीवाला सॉ मिल, लिमये राईस मिल, सहकारी तेलघाणा, बल्लाळेश्वर मॅच फॅक्टरी, गादी, विडी, मेणबत्ती, ब्रश, आईस्क्रीम आदींचेही कारखाने त्यांनी काढले व अनेकांना रोजगार मिळवून दिला. दादासाहेबांना दीर्घायुष्याची देणगी होती. पण त्यामुळे आपल्यापेक्षा लहान माणसांचे मृत्यू त्यांना पाहावे व पचवावे लागले. त्यांचा मुलगा, सून, कन्या यांचे एकापाठोपाठ निधन झाले. पण हे दु:ख मागे सारून ते सतत काम करीत राहिले. अखेर त्यांची प्राणज्योत ते १०१ वर्षांचे असताना मालवली.
अभिमान वाटतो मला मी त्या शाळेत शिकत आहे
दादासाहेब नेहमी म्हणायचे “विचाराने आणि आचाराने दरिद्री बनू नका” “कष्टाशिवाय प्रगती होत नाही” “रंजल्या गांजल्या लोकांची सेवा केल्यावर जे समाधान मिळतं ते एसी त बसून मिळत नाही” ….. असे कितीतरी साधी वाक्य जगण्याचं तत्वज्ञान शिकवणारी होती. दादासाहेब म्हणजे सर्वांसाठी चालतं फिरतं विद्यापीठ होतं. दादांना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
——– त्यांचाच एक सेवक ———
संजय पाटील, पालीवाला ज्यु. कॉलेज , नवीन पनवेल.