मोकाशी, दामोदर आत्माराम

पेण तालुक्यात सर्वत्र अण्णा मोकाशी या नावाने ओळखले जाणारे हे गृहस्थ म्हणजे पेणचे सार्वजनिक काकाच म्हणावयास हरकत नाही. मांगरुळच्या इनामदार मोकाशी घराण्यात जन्माला येऊन त्यांनी आपले अर्धेअधिक आयुष्य अत्यंत श्रीमंतीत घालविले. पेणची एके काळची मोकाशी-चाचड ही सोन्याची पेढी यांचीच. सन १९०८ मध्ये धारकरांकडील हत्यारे चोरीतील एक संशयीत देशभक्त आरोपी. त्यावेळचे मामलेदार दोंदे व धारकर यांच्या समयसूचकतेमुळे बचावले. सन १९३२ साली पकडून हिराकोटात अलिबाग येथे ठेवल्यावर यांना नोटीस देऊन सोडण्यात आले. पत्नी दिवंगत झालेली व लहान मुलांची जबाबदारी पाठीमागे असल्यामुळे त्यांनी नोटीस मोडली नाही.

 ता. ५-११-१९४१ रोजी जवाहर मैदानावर श्री.नानासाहेब धारकर यांचे अध्यक्षत्वाखाली यांचा निरोप समारंभ झाला. दुसर्‍या दिवशी ता. ६-११-१९४१ रोजी सकाळी ९-३० वाजता तीनबत्ती नाक्यावर युद्ध विरोधी घोषणा करुन यांनी सत्याग्रह केला. त्यांना चार महिने साधी कैद व पन्नास रुपये दंड किंवा एक महिना शिक्षा देण्यात आली. त्यांना ठाणे येथे नेण्यात आले. नंतर ता. ३०-१०-१९४२ रोजी अटक करुन वरळीच्या तुरुंगात त्यांना स्थानबद्ध करुन ठेवले. ते तेथे एक वर्ष होते.

पेण तालुक्याच्या खारेपाट विभागांत अण्णा मोकाशी हे अत्यंत लोकप्रिय होते. मुक्काम गांधे, तालुका पेण हे मुस्लीमगाव जाळले गेले तेव्हा हिंदु मुस्लीम यांच्यापैकी कोणावरही खटला होऊ नये व पकडलेले लोक सुटावे यासाठी त्यांनी केलेली खटपट व अविश्रांत श्रम कोणाच्याही स्मरणांतून जाण्यासारखे नाहीत. अनेक लोकांची हत्या होऊनही कुणावरही खटला झाला नाही. याचे श्रेय अण्णा मोकाशी यांनाच आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*