फडणवीस, देवेंद्र गंगाधर

devendra_fadanvis
देवेंद्र फडणवीस

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन झाल्यावर, महाराष्ट्र राज्याचे बावीसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची २८ ऑक्टोबर २०१४ या दिवशी पक्षातर्फे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. स्वच्छ प्रतिमा, महाराष्ट्राचा तरूण व उमदा राजकारणी, वेळप्रसंगी चुकीच्या धोरणांवर सरकारला व स्वपक्षातील नेत्यांना व कार्यकतर्यांना धारेवर धरणारे नेते तसंच अभ्यासू व्यक्तीमत्त्व अशी ओळख असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० साली झाला. त्यांचे वडिल, गंगाधर फडणवीस महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार होते, तर आई शोभा फडणवीस या युती सरकारच्या काळात मंत्री होत्या त्यामुळे राजकारण व समाजकारणाचे बाळकडू देवेंद्र फडणवीस यांना घरातूनच मिळाले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून कायद्याची पदवी त्यानंतर “बिझनेस मॅनेजमेंट” मध्ये पदव्युत्तर पर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे

देवेंद्र फडणवीस यांची १९८७ रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सहसचिव म्हणून निवड करण्यात आली होती. ही त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील मुहूर्तमेढ म्हणता येईल. १९९२ साली नागपूरच्या रामनगर वॉर्डातून ते नगरसेवक म्हणून महापालिकेवर निवडून आले. तर वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंब्याने नागपूर महापालिकेचे महापौर म्हणून त्यांची निवड झाली. विशेष म्हणजे भारतातील सर्वात लहान वयाचा महापौर अशी देवेंद्र फडणवीस यांची त्याकाळात ओळख निर्माण झाली होती.

१९९९ साली नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघामधून आमदार म्हणून ते विजयी झाले. तर २००४ सालच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते रणजीत देशमुख यांचा पराभव करून विधानसभेतील आणि पक्षातील आपले वजन वाढवले. मतदार पुनर्रचनेनंतर २००९ साली नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी तिसर्‍यांदा विजय संपादन करत आमदारकीची “हॅट्रीक” साजरी केली.२०१० रोजी “भा.ज.प” चे महासचिव म्हणून नेमणूक झाली तर २०१३ साली भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. विधानसभेत सर्वाधिक प्रश्न विचारण्याचा विक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आहे. नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय आमदार अशी देवेंद्र फडणवीस यांची ख्याती आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये सहज मिळून-मिसळून वागणारा नेता, त्यांचे प्रश्न समजून घेऊन सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आणि तळागळातील कार्यकर्त्याशी सततच्या संपर्कात व दांडगा जनसंपर्क असल्यामुळे २०१४ च्या सार्वत्रिक तसंच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी अप्रत्यक्षरित्या पक्षा सोबतच सर्वसामान्यांकडून पुश्ती मिळली होती.

1 Comment on फडणवीस, देवेंद्र गंगाधर

Leave a Reply

Your email address will not be published.


*