कोशकार आणि तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले देविदास दत्तात्रेय वाडेकर यांचा जन्म २५ मे १९०२ साली सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात कुरोली या खेडेगावात झाला.
त्यांचे वडील राहुरी येथे प्राथमिक शिक्षक होते. त्यामुळे प्राथमिक शिक्षण राहुरी येथे तर नगर येथे देविदास वाडेकर यांचे माध्यमिक शिक्षण झाले. महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. तत्त्वज्ञान विषय घेऊन १९२२ साली त्यांनी मुंबई विद्यापीठाची बी. ए. ची पदवी मिळवली आणि १९२६ साली ते एम. ए. झाले.
फर्ग्युसन महाविद्यालय आणि अंमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात दक्षिणा फेलो शिष्यवृत्तीधारक म्हणून त्यांनी काम केले. १९२६ ते १९३२ या काळात त्यांनी डेक्कन कॉलेज पुणे व राजाराम कॉलेज कोल्हापूर येथे अध्यापन केले. तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून १९३२ ते १९३९ मध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते होते. १९३९ ते १९४३ मध्ये सांगलीच्या विलिग्डन महाविद्यालयात सेवा केली. त्यानंतर १९४३ ते १९६२ ते परत फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवेत होते. त्यानंतर १९६२ साली विभागप्रमुख म्हणून ते सेवानिवृत्त झाले.
तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाला वाडेकरांनी भगवत् गीतेच्या संशोधनापासून सुरुवात केली. पण पुढे त्यांनी ग्रीक तत्त्वज्ञान आणि त्याच्या संकल्पनेवर विचार मांडले आहेत. तसेच वाटव्यांच्या मराठी काव्याचाही त्यांचा भरपूर अभ्यास होता. ‘प्राचीन मराठी पंडिती काव्य आणि पंडिती काव्य’ इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले. या ग्रंथातून पंडिती काव्यावर त्यांनी समीक्षा केली. ‘नलदमयंती कथा’, ‘किरातार्जुनीय कथा’ इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘माझी वाटचाल’ हे त्यांचे आत्मकथन प्रसिद्ध आहे.
अशा या तत्त्वज्ञ विचारवंताचे ५ मार्च १९८५ रोजी निधन झाले.
Leave a Reply