प्रभावळकर, दिलीप

Dilip Prabhavalkar

दिलीप प्रभावळकर हे नाव माहित नसलेला रसिक मराठी माणुस विरळाच. कारण ज्याला खरी अभिनयाची जाण व गोडी आहे , त्याला प्रभावळकरांमधला सच्चा व प्रतीभाशील कलावंत हा भावतोच. चेहर्‍यांवरच्या हावभावांवर व प्रभावी संवादफेकीवर समोरच्याला खिळवत ठेवणं ही एक कला असते व दिलिप प्रभावळकरांचा ही कला चांगलीच अवगत आहे. आजवरच्या त्यांच्या प्रदीर्घ, व गौरवास्पद कारकीर्दीत त्यांनी अनेक विनोदी, गंभीर, आक्र्मक, व मवाळ, तसेच नायकी व खलनायकी भुमिका अतिशय सफाईने वठविल्या आहेत व सर्व मराठी, अमराठी रसिकांच्या ह्रद्यसिंहासनांवर नम्रपणे राज्य केले आहे. अष्टपैलु व प्रयोगशील अभिनेता व वाचकांना खुदकन हसवता ह्सवता अंतर्मुख करणारा लेखक म्हणजेच दिलीप प्रभावळकर अशी त्यांची जनमानसात प्रतिमा असली तरी प्रत्यक्षात मात्र त्यांचं अतिशय शांत, लाघवी, व गंभीर रूप व बोलण पाहिलं की त्यांच्या विषयीचा आदर अजूनच द्विगुणित होतो. त्यांच्यामधील अस्सल नंबरी अभिनेताच त्यांना त्यांच्या खर्‍या स्वभावापासून दूर घेवून जातो. त्या भुमिकेमध्ये व त्या पात्राच्या भावविश्वामध्ये ते स्वतःच इतके बुडून जातात की पड्द्यासमोरचे दिलीप प्रभावळकर व पडद्याआडचे दिलीप प्रभावळकर यांच्यामध्ये फार मोठा विरोधाभास निर्माण होतो. अर्थात तो त्यांच्यामधील दडलेल्या सृजनशील अभिनेत्याचा निःसंशय विजय आहे.

दिलीप प्रभावळकर यांनी आजपर्यंत वेगवेगळ्या धाटणीचे, व त्यांच्यामधील विवीध अभिनयगुणांना वाव देतील असे सिनेमे व नाटके केली आहेत. तसेच प्रत्येक वयोगटातील मुलांना, तरूणांना, व अगदी पन्नासी ओलांडलेल्या वृद्धांना रूचेल अशी अलगद फिरकी घेणारे, विपुल साहित्य निर्माण केले आहे. त्यांचा विनोद व अभिनय अगदी त्यांच्यासारखाच आहे साधा, सरळ, हलका फुलका, परंतु जबाबदार. त्यामुळे त्यांची पुस्तके वाचून किंवा भुमिका बघ ून कोणी दुखावले गेल्याचे ऐकिवात नाही. त्यांत भडकपणाला किंवा उगीच जास्त स्पष्टवक्तेपणाला कुठेही जागा नाही. हो पण, तो काही विशिष्ठ व्यक्तींच्या वर्मी घाव बरोबर घालतो!! जीवनातले निरनिराळे प्रसंग व रोज आपल्याला येणारे अनुभव रंजक शब्दांमध्ये व मिश्कील शैलीमध्ये कसे मांडावेत हे त्यांच्या पुस्तकांमधून नक्कीच शिकण्याजोगे असते.

तीस वर्षांच्या स्वप्नवत अशा वाटचालीमध्ये प्रभावळकरांनी चेटकीपासून ते चौकट राजामधील वेडगळ तरूणापर्यंत, हसवाफसवी सारख्या खो खो हसवणार्‍या नाटकामध्ये सहा एक पेक्षा एक विनोदी भुमिका करण्यापासून ते एक झुंज वार्‍याशी, नाती गोती, कलम 302 मधल्या अतिशय गंभीर भुमिकांपर्यंत, सगळ्याच भुमिकांमध्ये, कधीही पुसला न जाणारा ठसा उमटविला आहे. या सगळ्या व्यक्तिरेखांचा एकमेकींशी तीळमात्रही संबंध नसला तरी त्या सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे त्या पडद्यावर साकारण्याआधी व साकारताना घेतली गेलेली अखंड मेहेनत. एखादी मनाजोगी भुमिका हातात आली की तिला किमान पाच सहा वर्षांकरिता तरी यादगार करून ठेवायचं, इतक्या उंचीवर ते तिला नेवून सोडतात. मग ते महाराष्ट्रातल्या चिमुकल्या नातवंडांचे लाडके आबा असोत किंवा मग पुर्ण भारताने डोक्यावर घेतलेले लगे रहो मुन्नाभाई मधले महात्मा गांधी असोत, मिळालेल्या प्रत्येक संधीचे त्यांनी सोने केले आहे.

दिलीप प्रभावळकरांचे चित्रपट, नाटकं, व पुस्तक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://www.dilipprabhavalkar.com

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*