चित्रकलेवर ‘दिनानाथ शैली’चा ठसा उमटविणारे दिनानाथ दामोदर दलाल. राजकीय, सामाजिक व्यंगचित्रे अतिशय मार्मिकपणे रेखाटता रेखाटता बोजडपणा आणि रसहीनता यापासून आपला कुंचला दूर ठेवून त्यांनी मराठी पुस्तकांच्या मुखपृष्ठात अमूलाग्र बदल घडवून आणला. गोव्यातील रसिकतेचा वारसा मिळालेला हा चित्रकार वाङमय आणि नाट्यकला या बाबतीतही रसिक होता. दिनानाथ दलालांच्या कुंचल्याचे वळण चटकन नजरेत भरत असे. मासिकांचे मुखपृष्ठ, बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवचरित्रासाठी रेखाटलेली चित्रमाला इ. अनेक चित्रांवर ठरावीक ‘दलाल टच’ हा हमखास ओळखू येत असे. मराठी साहित्यिकांना आपल्या पुस्तकावर दिनानाथांनी काढलेले मुखपृष्ठ याचा अभिमान वाटत असे. त्यांनी मराठी ग्रंथांच्या मुखपृष्ठाला तेजस्विता आणली तर मासिकांची मुखपृष्ठे नावीन्याने सजवली. ‘दीपावली’चे संपादन करताना वेचक साहित्य आणि आकर्षक सजावट या तंत्रांचा वापर केल्यामुळे मराठी साहित्य विश्वात ‘दीपावली’ ने दबदबा निर्माण केला होता. अशा या सिद्धहस्त चित्रकाराचे १५ जानेवारी १९७१ रोजी निधन झाले.
Leave a Reply