सध्या अमेरिकेत असलेल्या डॉ. आशुतोष कोतवाल यांनी ‘हिग्ज बोसॅन’ या मूलकणांच्या आकारमानाबाबत संशोधन केले आहे. त्याची दखल जगभरातील भौतिकशास्त्रज्ञांनी घेतली आहे…
विश्वाची रचना आणि त्याच्या जडणघडणीचे रहस्य उकलण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘डब्ल्यू बोसॉन’ या मूलकणांचा शोध जगभरातील अनेक शास्त्रज्ञ घेत आहेत. या कणांना ‘दैवी कण’ (गॉड्ज पार्टिकल) असेही संबोधले जाते. त्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करून युरोपात जमिनीखाली तयार केलेल्या सर्न प्रयोगशाळेत अचाट आकाराचा ‘लार्ज ह्रेडॉन कोलायडर’ (एलएचसी) नावाचा प्रयोग हाती घेण्यात आला आहे. या कणांच्या वस्तुमानाबाबत मूळचा पुणेकर असलेल्या डॉ. आशुतोष कोतवाल या शास्त्रज्ञाने अनोखे संशोधन केले असून, त्याची जगभरातील भौतिकींमध्ये चर्चा आहे. डॉ. कोतवाल हे याबाबत अमेरिकेत संशोधन करतात.
त्यांनी व त्यांच्या चमूने दैवी कणांचे (डब्ल्यू बोसॉन) मोजमाप करण्याचे तंत्र विकसित केले आहे. त्यांच्या तंत्रानुसार या दैवी कणांचे आतापर्यंतचे सर्वात अचूक वस्तुमान शोधण्यात यश आले आहे. त्याची अचूकता ०.०२ टक्के इतकी जवळ जाणारी आहे, असे अमेरिकेतील शिकागोजवळ असलेल्या ‘फर्मी नॅशनल अॅक्सीलरेटर लॅबोरेटरी’ या ख्यातनाम प्रयोगशाळेने जाहीर केले आहे. डॉ. कोतवाल यांच्या या यशामुळे गेली ४० वर्षे विविध शास्त्रज्ञांनी या कणांबाबत घेतलेला ध्यास एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. विशेष म्हणजे बोसॉन या मूलकणांचे अस्तित्व असल्याचा सिद्धांत प्रसिद्ध दिवंगत पदार्थशास्त्रज्ञ डॉ. सत्येंद्रनाथ बोस यांनी सर्वप्रथम मांडला होता. त्यावरून या कणांना ‘बोसॉन’ असे नाव देण्यात आले. आता याच कणांचे अचूक वस्तुमान शोधून त्यात भर टाकण्याचे कार्य कोतवाल यांच्या रूपाने एका भारतीयानेच केले आहे. डॉ. कोतवाल हे अमेरिकेतील नॉर्थ क्ररोलिना राज्यातील डय़ुक विद्यापीठात प्राध्यापक आहेत. त्यांनी अमेरिकेत अभियांत्रिकी व अर्थशास्त्र याविषयांची पदवी घेतली. त्यानंतर कोलंबिया विद्यापीठात पीएच.डी. करून त्यांनी शिकागोजवळील ‘फर्मी’ प्रयोगशाळेत संशोधनकार्य सुरू केले. ‘डब्ल्यू बोसॉन’ कणांच्या संशोधनाबरोबरच ‘टॉर क्वार्क’ या मूलकणांचे अचूक वस्तुमान शोधण्यातही त्यांनी यश मिळविले आहे. त्यांना अमेरिकेतील राष्ट्रीय स्तरावरील ‘आऊटस्टँडिंग इनव्हेस्टिगेटर अॅवॉर्ड’ व ‘स्कोन फेलोशिप’ हे प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत. पदार्थविज्ञानातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन अमेरिकन फिजिक्स सोसायटीने त्यांना विशेष फेलोशिप प्रदान केली आहे.
डॉ. आशुतोष कोतवाल यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला ध्यास हा कणाकणाचा ! हा लेख पुढील पानावर वाचा.