मुंजे, (डॉ.) धर्मवीर

Munje, (Dr.) Dharmaveer

भारतातील सैनिकी शिक्षणाचे प्रवर्तक, समाज सुधारक व निष्णात नेत्रविशारद धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महान द्रष्टे नेते होते. लोकप्रियतेची पर्वा न करता प्रसंगी लोकप्रवाहाच्या विरूद्ध उभे राहून समाजाच्या हिताचे तेच ठामपणे सांगणारे डॉ. मुंजे यांचे व्यक्तिमत्त्व तडफदार होते. १२ डिसेंबर १८७२ मध्ये विलासपूर येथे त्यांचा जन्म झाला. लहानपणीच त्यांच्या धाडसी वृत्तीचा परिचय झाला. महाविद्यालयीन शिक्षण घेताना बाळकृष्णाने वकील व्हावे असे वडील शिवरामपंतांचा आग्रह होता. परंतु घरी कुणालाही न सांगता त्यांनी मुंबईच्या ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतला. डॉक्टर झाल्यावर त्यांनी प्लेग प्रतिबंधक खात्यात नोकरी केली. दक्षिण आफ्रिकेतील बोअर युद्धातील जखमींवर उपचार करणार्‍या पथकाबरोबर डॉक्टर द. आफ्रिकेत गेले. तेथे त्यांचा प्रथम मुक्काम म. गांधी यांच्याकडेच होता. मायदेशी परत आल्यावर नागपूरला त्यांनी दवाखाना सुरू केला. डोळ्यांच्या शस्त्रक्रियेवर संशोधन करून ‘नेत्रचिकित्सा’ हा ग्रंथ लिहिला. तो अत्यंत उपयुक्त मानला जातो. १९०५ मध्ये राजकीय परिषद भरवण्यात

पुढाकार घेऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला. अवघ्या ३२ व्या वर्षी नागपूरच्या काँग्रेस अधिवेशनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. १९३० व १९३१ ला लंडन येथे दोन्ही गोलमेज परिषदेला डॉ. मुंजे अधिकृत प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. डॉ. मुंजे यांनी समाज सुधारण्याच्या कार्यात ही मोठा पुढाकार घेतला. मात्र काँग्रेसच्या नीतीला कंटाळून त्यांनी हिदू महासभेचे काम सुरू केले व अध्यक्षपदही भूषविले. अस्पृश्यता विरोधात त्या काळी जे समाज प्रबोधन केले त्याबद्दल त्यांना शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांनी ‘धर्मवीर’ पदवी दिली.
हिदू तरुण सशक्त आधुनिक युद्ध शास्त्रात प्रवीण झाला पाहिजे याचा त्यांना ध्यास होता. यासाठी त्यांनी जर्मनी, इटली इ. देशातील सैनिकी शाळांना भेटी दिल्या. या संदर्भात मुसोलोनीचीही भेट घेतली व १९३६ मध्ये म्हणजे वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांनी नाशिकला भोसला मिलिटरी स्कूलची स्थापना केली. यासाठी कराची पासून देशभर प्रवास करून मदत मिळवली व अत्यंत दूरदृष्टीने विशाल माळरानावर एक भव्य स्वप्न साकार केले. ३ मार्च १९४८ ला त्यांच्या कर्मभूमीतच त्यांनी देह ठेवला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*