ठाण्यातील औषधाशास्त्र व जैवतंत्रज्ञान या क्षेत्रातील संशोधनामध्ये चटकन समोर येणारं नाव म्हणजे डॉ. सौ. कल्पना संजय जोशी हे होय. बी.एस.सी. ला पुणे विद्यापीठात मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवून, १९८१ मध्ये पुणे विद्यापीठात जीवतंत्रज्ञान विषयात एम.एस.सी. ची परीक्षा देखील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान डॉ. कल्पना जोशी यांनी मिळवला. पुढे १९८२ साली.परळ, मुंबई येथील टाटा कॅन्सर हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या “कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्युट” येथे रक्ताच्या विशिष्ट कर्करोगावरील संशोधनाला मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट (पी.एच.डी.) ही पदवी मिळाली. पुढे या संशोधन कार्याचा अधिक अनुभव घेण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ आयोवा, अमेरिका या विद्यापीठाची पोस्ट डॉक्टरेट फेलोशिप मिळवून १९८७ ते १९९२ पर्यंत अमेरिकेत संशोधन कार्य केलं. पुढे मुंबईत येऊन वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये रक्तरोग विभागाच्या स्थापनेत व विकासात महत्वाचे योगदान दिलं. त्यानंतर डॉ. जोशी यांनी मुलुंड येथील हेवस्ट मॅरिऑन रिसेल या आंतरराष्ट्रीय औषधनिर्माण व संशोधन क्षेत्रातील कंपनीमध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्य सुरु केलं.
गेली वीस वर्षे डॉ. कल्पना जोशी ह्या कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मात करु शकतील, अशा प्रभावी औषधांचे संशोधन कार्यकरीत आहेत. त्या सध्या गोरेगांव येथील पिरामल लाईफ सायन्सेस या भारतीय औषध संशोधन संस्थेत औषधशास्त्र विभागाच्या उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. त्यांनी कॅन्सर या रोगावर नव्याने संशोधन केलेल्या औषधांच्या आतापर्यंत २२ आंतरराष्ट्रीय पेटंटस् मिळवली आहेत. त्यांनी संशोधित केलेल्या तीन औषधांच्या चाचण्या अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व भारत या देशांमधील प्रत्यक्ष कॅन्सरग्रस्त रुग्णांवर सुरु असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
पुरस्कार : यांना २००८ सालचा रोटरी क्लब, डोंबिवलीचा वुमन ऑफ द इयर पुरस्कार, सह्याद्री वाहिनीचा हिरकणी पुरस्कार, लोकमत वृत्तपत्राचा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार, इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
Leave a Reply