कर्करोग संशोधक डॉ.कमल जयसिंग रणदिवे यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१७ रोजी पुणे येथे झाला.
कमल रणदिवे यांचा जन्म प्रगतिशील समर्थ कुटुंबात झाला. त्यांचे वडील दिनकर दत्तात्रेय समर्थ हे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते. ते वडील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते. त्यांनी त्यांच्या मुलांप्रमाणे सर्व मुलींनाही उच्च शिक्षणाची संधी दिली. कमल समर्थ वनस्पतिशास्त्र या विषयात १९३८ साली बी.एस्सी. (ऑनर्स) झाल्या.
डॉ. खानोलकरांच्या मार्गदर्शनाखाली १९५० साली उंदरांमधील स्तनांच्या कर्करोगावर केलेल्या संशोधनासाठी रणदिवेंना मुंबई विद्यापीठाने पीएच.डी. ही पदवी दिली. पुढील वर्षी त्यांना रॉकफेलर फाउण्डेशनची प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती मिळाली. त्या काळी ऊती संवर्धन (टिश्यू कल्चर) हे तंत्रज्ञान नव्यानेच विकसित केले जात होते. या तंत्रज्ञानाची कर्करोग संशोधनात होणाऱ्या भविष्यातील उपयोगाची खात्री पटल्यामुळे रणदिवे यांनी, अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या जगप्रसिद्ध प्रयोगशाळेत काम करण्याची संधी मिळवली.
रणदिवेंनी त्यांच्याबरोबर काम करणारे शास्त्रज्ञ व विद्यार्थी यांच्या मदतीने निरनिराळ्या पेशींच्या स्वतंत्र वाढणाऱ्या मालिका प्रस्थापित केल्या. त्यांच्या गुणसूत्रांचा अभ्यास करून या तंत्रज्ञानाचा उपयोग कर्करोग संशोधनासाठी भारतात सर्वप्रथम केला.
रणदिवेंना त्यांचे सहकारी, तसेच विद्यार्थीवर्गाची विज्ञानातील आवड हेरण्याची विलक्षण जाण होती. त्यानुसार त्या प्रत्येकास विषय निवडून देत व मार्गदर्शन करीत असत. त्यांच्या स्वभावाचा आणखी एक विशेष पैलू होता.
त्यांच्या सर्व सहकारी संशोधकांनी नवी दिशा आखून स्वत:च्या आवडीनुसार स्वतंत्रपणे काम करावे असे त्यांना वाटे व त्यानुसार त्यांचे प्रयत्न असत. या सर्वव्यापी व दूरदर्शी विचारांमुळे पेशी, जीवशास्त्र कारसिनोजिनेसिस ट्यूमर इम्युनोलॉजी या स्वतंत्र शाखा कर्करोग संशोधन केंद्रात निर्माण झाल्या. तसेच, त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर बऱ्याच वर्षांनी प्रस्थापित झालेल्या विषाणूशास्त्र (व्हायरोलॉजी), रेण्वीय जनुकशास्त्र (मॉलेक्युलर जेनेटिक्स) या शाखांचे बीजही त्यांनीच केलेल्या स्तनांच्या कर्करोगावरील संशोधनात आढळते.
रणदिवेंना वासंती देवी अमीरचंद पुरस्कार, वाटुमल फाउण्डेशनचा पुरस्कार, सॅडो अवॉर्ड, टाटा मेमोरियल सेंटरचे सुवर्णमहोत्सवी मानचिन्ह व बनारस हिंदू विद्यापीठाचा पुरस्कार असे अनेक मानसन्मान मिळाले. त्यांची इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी व महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स या संस्थेत ‘फेलो’ म्हणून निवड झाली. महाराष्ट्र राज्याच्या विज्ञान व तंत्रज्ञान समितीच्या सदस्या असताना त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. भारत सरकारने ‘पद्मभूषण’ ही पदवी बहाल करून राष्ट्रपातळीवर त्यांच्या कार्याचा गौरव केला.
डॉ.कमल रणदिवे यांचे निधन ११ एप्रिल २००१ रोजी झाले.
Leave a Reply