ढवळीकर, (प्रा.) (डॉ.) मधुकर केशव

पुरातत्त्व शास्त्राची मुहूर्तमेढ रोवणारे आणि या क्षेत्रातील अभ्यासकांसाठी पितामह असलेले प्रा. ढवळीकर यांचा जन्म १९३०चा. त्या काळात पुरातत्त्वशास्त्र अगदीच दुर्लक्षित होते. अर्थात आजही त्याबाबत सरकारी पातळीवर उदासीनता आहेच. त्यामुळे पदवी-शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतीय पुरातत्त्व विभागामध्ये १९५३ पासून टेक्निकल असिस्टंट म्हणून कामाला सुरुवात करून ढवळीकर यांना वेगळी दिशा पकडली. प्रा. ढवळीकर यांची अभ्यास, चिकाटी आणि विषयाचा चारी बाजूंनी विचार करण्याची वृत्ती यामुळे त्यांनी या शास्त्राच्या संशोधनात मूलभूत स्वरूपाचे कार्य केले. काही काळ ते नागपूर विद्यापीठाच्या ‘पुरातन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्वशास्त्र’ या विषयाचे शिक्षक होते. त्यानंतर पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी १९९० पर्यंत अनेक विद्यार्थी रत्न घडवले. दरम्यानच्या काळात त्यांचे संशोधन सुरू होते.

पुण्यातील इनामगाव येथील उत्खनन हा भारतीय पुरातत्त्व शास्त्रातील मैलाचा दगड ठरला. १९६८ ते १९८३ दरम्यान तब्बल बारा टप्प्यांत झालेले हे संशोधन आज २५ वर्षानंतरही आदर्श मानले जाते. या उत्खननादरम्यान त्यांनी वापरलेली पद्धत आणि विश्लेषण मोलाचे आहेच, पण अशा प्रकारच्या कामात पहिल्यांदाच विविध विषयांतील तज्ज्ञांना एकत्र आणून सर्वांगीण अभ्यास करण्याची पद्धती जगभरात वाखाणली जाते. देशातील पुरातत्त्वदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आथिर्क दृष्टीने अभ्यास करून ती पुस्तकरूपाने मांडण्याचे प्रा. ढवळीकर यांचे कार्य तर या शास्त्राला दिशा देणारे ठरले. पुरातत्त्व शास्त्राच्या प्रत्येक विभागाचा बारकाईने अभ्यास करून तो पुस्तकबद्ध केल्याने या शास्त्राचे डॉक्युमेंटेशन अभ्यासकांसाठी उपलब्ध झाले.

नाण्यांच्या अभ्यासावरील ‘नाणकशास्त्र’ हे पुस्तक तर या विषयावरील एकमेव आहे. याशिवाय पर्यावरण व पुरातत्त्वशास्त्र विषयावरील त्यांचे पुस्तक म्हणजे दोन्ही विषयांना वेगळा आलेख देणारे ठरले. अजिंठा आणि सांची या ठिकाणांचा सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यासही या विषयाला कलाटणी देणारा ठरला. दरम्यान ते १९८२ मध्ये डेक्कनचे सहसंचालक व १९८५ मध्ये संचालकही झाले. प्रा. ढवळीकरांचे अनेकांना माहिती नसलेले एक वैशिष्ट्य म्हणजे ते उत्तम व्यवस्थापक होते. डेक्कन कॉलेजच्या संचालकपदी असताना या संस्थेचे नियोजनपुर्वक सक्षमीकरण करून पुरातत्त्व शास्त्राच्या संशोधनाला त्यांनी बळकटी दिली. डेक्कन कॉलेजच्या म्युझिअमचाही त्यांनी विकास केला. रॉयल एशियाटिक सोसायटीने त्यांना २०१० मध्ये शिष्यवृत्ती दिली. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयानेही २०१० मध्ये त्यांना रवींदनाथ टागोर शिष्यवृती दिली. भारत सरकारच्या “पद्मश्री” या मानाच्या किताबाने मधुकर ढवळीकर यांना सन्मानित करण्यात आले आहे.

सध्या ते पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे विश्वस्त म्हणून काम पाहतात. पुरातत्त्व शास्त्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणारे आणि या शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी मूलभूत माहितीचा सोत उपलब्ध करणार्‍या प्रा. ढवळीकर यांच्या कार्याची उशिरा का होईना, दखल घेतली गेली.

( संदर्भस्त्रोत- महाराष्ट्र टाईम्स )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*