भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची प्रतिमा मराठी माणसांच्या मनात एक स्वप्नाळू व कविमनाचा राजकारणी अशी आहे. त्यांच्या या स्वप्नाळू वृत्तीमुळे त्यांच्या राजकारणाने भारताचे नुकसान केले अशीच ब-याचजणांची धारणा आहे. पण पंडित नेहरू हे प्रत्यक्षात खूप धोरणी व विचारी मुत्सद्दी होते. त्यांचे काव्यमय बोलणे आणि प्रत्यक्ष राजकारण यात खूप फरक होता. त्यांनी जे काही राजकारण केले त्याला कठोर वास्तवाचे अधिष्ठान होते हे मराठी माणसाला सर्वात प्रथम समजवून सांगण्याचे काम कुणी केले असेल तर ते डॉ. न. गो. राजूरकर यांनी. त्यांनी प्राचार्य कै. नरहर कुरुंदकर यांच्या समवेत ‘पंडित नेहरू एक मागोवा’ हा गंथ लिहून नेहरूंच्या राजकारणाची कठोर चिकित्सा केली आहे. या ग्रंथामुळे नेहरूंच्या एकंदर राजकारणाकडे पाहण्याची वेगळीच दृष्टी निर्माण होते. मराठीत समकालीन राजकारणावर जी ग्रंथनिर्मिती झाली आहे, त्यातील हा महत्त्वाचा ग्रंथ आहे. या ग्रंथामुळे नरहर कुरुंदकरांची मराठी समाजाला असलेली ओळख अधिक दृढ झाली, पण न. गो. राजूरकर यांची म्हणावी तशी ओळख झाली नाही. ते हैदराबादचे रहिवासी असल्यामुळे कदाचित हे झाले असावे किंवा त्यांची बरीचशी ग्रंथसंपदा इंग्रजीत असल्यामुळे हे झाले असावे. डॉ. राजूरकर हे ख्यातनाम लेखक व वक्ते आहेत. त्यांनी इंग्रजीत आठ तर मराठीत पाच ग्रंथ लिहिले आहेत. इंग्रजीतील ग्रंथात त्यांनी नेहरूंचे राजकारण, भारताची स्वातंत्र्य चळवळ, भारताची फाळणी, गांधी व नेहरूंचे तुलनात्मक जीवनविषयक तत्त्वज्ञान, गांधीजींचे राजकीय नेता व विचारवंत म्हणून असलेले व्यक्तिमत्त्व, नेहरूंचे स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कार्य, भारताची धर्मनिरपेक्षता आदी विषयांचा ऊहापोह केला आहे. त्यांनी पंडित नेहरूंशी अनेक वेळा चर्चा करून त्यांचे राजकारण समजून घेतले व त्यावर प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवली आहे. मराठीत त्यांनी नेहरूंवरील ग्रंथाखेरीज विचारयात्रा, अंजली, प्रकाशचित्रे आणि प्रतिबिंब ही पुस्तके लिहिली आहेत.
राजूरकर, (डॉ.) न. गो.
डॉ. राजूरकर यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात जवळजवळ तीन दशके प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्यांचे राजकारणप्रेम हे फक्त ग्रांथिक नाही तर त्यांनी शाळा व कॉलेजमध्ये असताना विद्यार्थी चळवळींचे नेतृत्व केले आहे. त्यांचे ऊर्दू भाषेवरही प्रभुत्व आहे व या भाषेत त्यांनी कविता व नाटके लिहिली आहेत. १९९१साली त्यांनी लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचे विश्लेषण करणारी व्याख्याने दिली होती. नांदेडच्या प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानातर्फे नांदेड येथे त्यांच्या या ग्रंथसेवेचा गौरव वाड्:मय पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. मात्र महाराष्ट्र सरकारने आणि महाराष्ट्रानेच त्यांची म्हणावी तितकी दखल घेतली नाही हे तितकेच खरे आहे.
Leave a Reply