निफाडकर, (डॉ.) प्रमोद

डॉ. प्रमोद निफाडकर ह्यांच्या वैद्यकिय कारकिर्दीवर नजर जरी टाकली तरी अस्थमाच्या रूग्णांसाठी त्यांनी उभारलेले कार्य बघून अचंबा वाटतो. अस्थमा झालेल्या व जगण्याची, किंवा पुर्वीसारखी मुक्त बागडण्याची आशाच सोडून दिलेल्या रूग्णांना गड किल्यांवर भटकवणारा व पुर्वीची उमेद व आत्मविश्वासाची ज्योत त्यांच्या मनात पुन्हा प्रज्वलीत करणारा एक मराठमोळा मावळा म्हणजे डॉक्टर प्रमोद निफाडकर हे होते. आपल सगळ आयुष्यच त्यांनी शहरी व ग्रामीण भागांतील अस्थमाग्रस्तांची निरपेक्ष सेवा व सुश्रुशा करण्यात घालविले. परंतु केवळ त्यांचे वैद्यकिय औषधोपचार यापुरतेच मर्यादित असे डॉक्टरांचे योगदान नव्हते, तर त्या रूग्णांना जगण्याचा हुरूप पुन्हा आणून देणे, त्यांच्यातील सळसळणार्‍या तारूण्याला साद घालणे, अस्थमाबद्दलचा त्यांच्या भितीचा बागुलबुवा मुळापासून दूर फेकणे, असे बहुआयामी काम ते आवडीने व निष्ठेने करीत असत. अस्थमाविषयी जेवढे कल्पक, व्यापक व प्रबोधनात्मक कार्य त्यांनी केले आहे तेवढे खचितच कुणी केले असेल.

डॉक्टरांनी त्यांच्या रूग्णांना निरनिराळ्या औषधांचे कोर्सेस घेण्यापेक्षा त्यांची चार भिंती मध्ये सामावलेली जिवनपध्दती बदलविण्यास सांगितले. त्यांना मोकळा वारा, कोवळ उन्ह, आरोग्यदायी अन्न व भरपूर फिरण्याचा कानमंत्र दिला निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने व आरोग्यदायी अन्न पाणी व हवा यांचे सेवन केल्यामुळे औषधांमुळे होणारा खर्च निम्याने वाचविता येऊ शकतो असे सतत आपल्या रूग्णांना कळवळीने सांगत असत. त्यांच्या ह्या वरकरणी घरगुती वाटणार्‍या उपायांनी अनेक रूग्णांची अस्थम्याची तक्रार कमी केलेली आहे. पिंडाने जरी ते डॉक्टर असले तरी अस्थम्याविषयी सखोल ज्ञान व जाण असल्यामुळे ते अनेकदा संशोधकाच्या भुमिकेतही शिरायचे. अस्थ्म्याविषयी त्यांनी केलेल्या अनेक संशोधनांमुळे या व्याधीच्या औषधोपचाराला व निवारणाला नवी दिशा मिळाली. अस्थम्याविषयी, सर्वांच्या डोळ्यांना लागलेली गैरसमजुतींची झापडं काढण्याचे काम निरंतर प्रामाणिकपणे त्यांनी केले होते. अ‍ॅलर्जी या विषयातही त्यांचा हातखंडा होता. मुळात अस्थमा पुर्णपणे निवारण्यासाठी अ‍ॅलोपॅथी एकटी समर्थ आहे या विधानावर विश्वास नव्ह्ता. रूग्ण आतून खडबडून जागा झाला तर अस्थमा त्याचे काही बिघडवू शकत नाही या विधानांचे ते पुरस्कर्ते असल्याने औषध कंपन्यांनी वा विक्रेत्यांनी त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची कास कधीच धरली नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*