डॉक्टर संजय गोविंदराव पोहरकर- डॉ. संजय गोविंदराव पोहरकर हे लाखनी, या भंडारा जिल्ह्यामधील गावामध्ये वास्तव्यास असणारे प्रतिभावंत साहित्यीक, व कलाकारी वृत्तीचे कवी आहेत. शिक्षण कला व साहित्य या एकमेकांस बर्यापैकी पुरक असलेल्या प्रांतांमध्ये त्यांचा राबता लक्षणीय स्वरूपाचा आहे. पेश्याने शिक्षक, आवडीने साहित्यीक व उत्तुंग प्रतिभेने कवीत्व स्वीकारलेल्या पोहरकरांचे व्यक्तिमत्व या तिनही क्षेत्रांवर साज चढवणारेच आहे. कवितेच्या अद्वितीय सौंदर्यामध्ये घोळलेले, राष्ट्रीय शिक्षण प्रसाराच्या तत्वाने पुरते झपाटलेले, व जगण्यामध्ये आलेल्या असंख्य कडु-गोड अनुभवांना व आठवणींना आपल्या जादुई लेखणीच्या साहाय्याने जीवंत करणारे त्यांचे अष्टपैलु व्यक्तिमत्व, त्यांच्या, जीवनातील प्रत्येक आव्हानाशी उत्सफुर्तपणे टक्कर घेण्याच्या वृत्तीमुळे, आज या सर्व प्रांताच्या अगदी खोलवर जावून तावून सुलाखून निघालेले आहे. लाखनी येथील समर्थ महाविद्यालयामधील हुषार, चणाक्ष, व सेवाभावी वृत्तीचे प्राचार्य, कट्टर सावरकरवादी विचारवंत, व आता पेटवू सारे रान, संवाद कौशल्य, मुलांसाठी सावरकर, अशा उत्कृष्ठ प्रतींच्या पुस्तकांचे लेखक अशी बहुआयामी त्यांची ओळख आहे. पोहरकरांची सामाजिक तळमळ व असामान्य प्रतिभा जशी त्यांच्या पुस्तकांमधून हळुवार उमलत जाते, तशीच अलगदपणे ती त्यांच्या कित्येक कवितांमधुनही हळव्या व जाणकार वाचकांच्या सरळ मनांत झिरपते. देव आंघोळीला गेले, कलियुगातील ध्रुवतारा ह्या त्यांच्या काही निवडक काव्यसंग्रहांमधून ‘एक सामाजिक आशयाचे भान असलेला संवेदनामग्न कवी’ अशी त्यांनी वाचकांच्या मनात त्या ध्रुवतार्याएवढीच अढळ ओळख निर्माण केलेली आहे. त्यांचा जन्म 8 जुलै, 1962 रोजी झाला.
Leave a Reply