डॉक्टर विट्ठल नागेश शिरोडकर यांचे महिलांसाठी असलेले अतुल्य योगदान पाहिले की मन भरून येते. मातृत्व हा प्रत्येक मातेसाठी व तिच्या कुटुंबियांसाठी सर्वात आनंदाचा, समाधानाचा, व आयुष्यभर जतन करून ठेवण्यासारखा क्षण असतो. शेवंतीच्या फुलांसारखी सुगंधी दरवळ आणणारा, व आनंदाच्या व हास्याच्या कारंज्यांनी घर भारून टाकणार्या या क्षणाला कोणाची नजर लागू नये यासाठी त्यांनी आपले सारे आयुष्य व कारकीर्द पणाला लावली होती. सतत होणारे गर्भपात या विषयावरील त्यांचे यशस्वी संशोधन, म्हणजे प्रत्येक गृहिणीसाठी तिच्या आईपणाची शाश्वती देणारे अमृतच ठरले. त्याकाळी शारिरीक गुंतागंतींमुळे गर्भपात होण्याचे प्रमाण फार मोठे व सामान्य होते.
जसेजसे गर्भातील बाळाचे वजन वाढत जाते तसेतसे काही दुर्दैवी स्त्रियांच्या गर्भाशयाचे स्नायू शिथील होत जातात. मग अगदी निरोगी असलेले बालक गर्भाशयाला न पेलल्यामुळे गर्भपात होतो. गर्भाशयाच्या शिथील स्नायूंमुळे होणारे गर्भपात टाळण्यासाठी त्यांनी नवीन शस्त्रक्रिया शोधून काढली. ‘शिरोडकर्स स्टिच’ ही त्यांची संकल्पना जगप्रसिध्द आहे. या शस्त्रक्रियेला जगभर प्रसिध्दी मिळाली. या संपुर्ण शस्त्रक्रियेला व त्यासाठी वापरण्यात येणार्या उपकरणांना त्यांचेच नाव दिले गेले. जगभरातील असंख्य स्त्रियांच्या दुवा सोबत घेवून त्यांनी कुटुंबनियोजनासाठी फेलोपियन ट्यूब्जवर अनेक शस्त्रक्रिया केल्या. त्यांच्या चित्रफिती आजही अनेक प्रगत देशांमध्ये दाखविल्या जातात. प्रोलॅप्स युटेरस यावरील शस्त्रक्रियेतही त्यांचा हातखंडा जगन्मान्य होता.
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतही भारतात वैद्यकशास्त्राचा आभ्यास पूर्ण केल्यावर डॉ. शिरोडकर लंडनला गेले. तेथे उच्च शिक्षण घेतल्यावर ते भारतात परतले. आपल्या संशोधनाने व वैद्यकिय कौशल्याने निसर्गाच्या मनात नसतानासुध्दा कितीतरी आयांना त्यांचे मातृत्व पुन्हा जगण्याची संधी मिळाली या गोष्टीचे त्यांना अतीव समाधान होते. कितीतरी कुटुंबीयांच्या हातात त्यांच्या वंशाचा नंदादीप शिरोडकरांनी सुरक्षितपणे सुपुर्द करून त्यांच्या आयुष्यात आनंदाचा हुंकार भरला आहे. या त्यांच्या कामगिरीबद्दल भारत सरकारने “पद्मभूषण” या किताबाने त्यांचा सन्मान केला होता.
Leave a Reply