शिंदे, एकनाथ

Shinde, Eknath

शिवसेनेची मुळे ही ठाण्यामधील प्रत्येक जागेत रूजविण्यात एकनाथ शिंदे यांचा सिंहाचा सहभाग आहे. सुरूवातीस साधे शिवसैनिक, व मग आमदार, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आणि आता महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री अशा एका मागोमाग एक शिडया चढलेल्या एकनाथ शिंदेनी नेहमीच त्यांच्या मतदात्यांच्या आकांक्षाचा व रास्त अपेक्षांचा प्रामाणिक पाठपुरावा केला आहे.

तल्लख राजकारणी मेंदुमध्ये दडलेले त्यांचे समाजसेवी हृदय वारंवार आपले रूप दाखवीत असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक कार्याला समानतेच्या तत्वांची झालर आहे. पोलिस कर्मचार्‍यांच्या समस्यांवरती त्यांनी आपला आवाज उठविला होता. गोरगरिबांचा नेता व गरिबांचा कैवारी हीच त्यांची ओळख, बरेचदा त्यांच्या प्रत्येक कृतीमधून प्रतिबिंबीत होत असते.

त्यांचे नाव अगक्रमाने घेतले जाते, ते सॅटिस या ठाण्यातील सर्वात मोठया व महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या भरघोस अशा यशासंदर्भात. जेव्हा या प्रकल्पाला स्थानिक पातळीवरून विरोध होत होता, त्यावेळी स्थानिकांना या प्रकल्पाचे सर्वांगीण महत्व पटवून देण्यात व सरकारी मान्यतेसाठी स्थानिक प्रतिनिधींपासून ते दिल्लीपर्यंत वारंवार फेर्‍या मारण्यात त्यांचा एकहाती वाटा होता. आता ह्या प्रकल्पामुळे ठाण्यामधील वाहतुक कोंडी कितीतरी प्रमाणावर आटोक्यात आली आहे. सॅटिसप्रमाणेच त्यांनी मुलभूत सुविधांच्या तसेच पायाभूत सुविधांच्या पुर्ततेसाठी, गेली कित्येक वर्षे विधानसभेत विविध मागण्यांचे थैमान घातले आहे.

जिल्ह्यामध्ये विस्तृत पसरलेल्या चतुर्सिमांच्या रस्ते विकासातील त्यांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रमाणेच पाणी, आरोग्य, शिक्षण या त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवरही, त्यांनी अनेक विकासकामे केली आहेत. २६ जुलैला जेव्हा पुराने मुंबई उपनगरीय विभागांमध्ये मृत्युंचे तांडव सुरू केले होते, तेव्हा त्यांनी शहाड, अंबरनाथ, बदलापूर, व ठाणवनावश्यक साहित्य वाटले होते. त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिकांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे आयोजन करून, तर डायबिटीस रूग्णांकरिता होईल ती मदत करून नेहमीच ते त्यांच्या सामाजिक बांधिलकीला जागले आहेत.

शिवसेना पक्षात  त्यांनी कधीच कुठल्या पदासाठी आटापिटा केला नव्हता, परंतु त्यांच्यामधील बुलंद नेतृत्वगुणांमुळे व संयमी वृत्तींमुळे त्यांनी आजपर्यंतच्या प्रवासात, नगरसेवक, सभागृह नेते, जिल्हा संपर्क प्रमुख अशा अष्टपैलु भुमिका भुषविल्या आहेत. शांत व मनमिळाऊ नेता व हाडाचा समाजसेवक अशी जनमानसात प्रतिमा असली तरी प्रसंगी मोर्चे, निदर्शने, संप अशा गोष्टींमधून त्यांच्यामधल्या ज्वलंत व आक्रमक राजकारण्याचे दर्शन, सदैव इतरांना घडत असते. ठाणे-कल्याण रेल्वे ट्रॅक समांतर रस्त्यासाठी, कापूरबावडी, मानपाडा व मीनाताई ठाकरे चौक अशा तीन ठिकाणांवर उड्डाणपुल बांधण्यासाठी, आणि वाढते भारनियमन रोखण्यासाठी ते सतत सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत.

विधिमंडळ, जिल्हा आणि मतदारसंघातील त्यांच्या भरीव कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम)  हे पद त्यांच्याकडे चालून आले असून त्यावरही ते त्यांच्या कामाचा ठसा उमटवल्याशिवाय राहाणार नाहीत.  ते सध्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

(संदर्भ आणि लेखन : मराठीसृष्टी टिम)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*