फय्याज यांचा जन्म ५ जानेवारी १९४८ रोजी झाला.
सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक, विनोदी आणि संगीतप्रधान अशा विविध प्रकारच्या नाटकांतून आपल्या कसदार अभिनयाने त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. गजल, ठुमरी, लावणी आणि नाट्यसंगीत असा गायनाचा मोठा आवाका असणाऱ्या फय्याज यांनी गेली अनेक वर्षे आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांचे पूर्ण नाव फय्याज इमाम शेख.
गाण्याची-नृत्याचीआवड तर होतीच. ती ओळखलेल्या आजीने राम जालीहाळ आणि पंचवाडकरबुवांची तालीम गाण्यासाठी लावली; तर नृत्यासाठी मास्टर हसन (कथ्थक) आणि कट्टीबंधू (भरतनाटयम) यांच्याकडे पाठवलं.
नृत्य-गायनाचे हे संस्कार होत असतानाच आकाशवाणीवरील संगीतसभासारख्या कार्यक्रमांतून बडे गुलामअली खान, बेगम अख्तर यांच्यासारख्या गायकांची गायकी त्यांच्या कानावर पडत होती. त्यांचं आकाशवाणीवरचं गाणं फय्याज अजिबात चुकवत नसत. या गायकांपैकी कुणाची सोलापुरात मैफल असली की, फय्याज यांचा जीव तुटायचा, पण तिकीटाच्या भरमसाठ दरामुळे त्यांना या मैफली ऐकता यायच्या नाहीत.
बडे गुलामअली खाँ आणि बेगम अख्तर यांच्या गायकीमुळे त्यांनी उत्तर हिंदुस्थानी गायकीचा ध्यास घेतला. ही गायकी आपल्याला कधी शिकता येईल का, असा प्रश्न वयाच्या बारा-तेराच्या वर्षीच त्या स्वत:लाच विचारू लागल्या.
“अश्रूंची झाली फुले’ मधली नीलम आणि काही वर्षांनंतर त्याच नाटकातील सुमित्रा या दोन भूमिकाही दीदींनी साकारल्या. याशिवाय “वीज म्हणाली धरतीला’मधील जुलेखा ही त्यांची भूमिका तर खूपच गाजली. “तो मी नव्हेच’, “मी मालक या देहाचा’, “अंधार माझा सोबती’, “कट्यार काळजात घुसली’ही “नाट्यसंपदे’ची आणि “पंडितराज जगन्नाथ’, “मत्स्यगंधा’, “संत गोरा कुंभार’, “बावनखणी’, “गुंतता हृदय हे’, “सूर राहू दे’ ही इतर संस्थांची नाटकेही त्यांनी आपल्या अभिनयाने आणि गायनाने गाजवली. त्या काळात “तो मी नव्हेच’चे हजार प्रयोग झाले होते.
“अश्रूंची झाली फुले’चे ७०० ते ७५० प्रयोग झाले होते, तर “कट्यार’चे भारतभरात ५३५ प्रयोग झाले. “कट्यार’ हे त्या काळातले अतिशय गाजलेले नाटक. पुरुषोत्तम दारव्हेकर, पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. वसंतराव देशपांडे या तीन दिग्गजांच्या प्रतिभेतून साकारलेल्या या नाटकात संवाद आणि संगीताची बहार होती. नाटकाची सुरवातच भैरवीने होत असे. त्यावेळी हा एक नवा प्रयोग होता.
फय्याज यांनी केलेली नाटकं आणि त्यातील त्यांच्या भूमिका.
गीत गायिले आसवांनी (मंझर), अंधार माझा सोबती (ज्योती), अश्रूंची झाली फुले (नीलम, सुमित्रा), कटयार काळजात घुसली (झरीना), किनारा (जीजी), गुंतता हृदय हे (कल्याणी), संत गोरा कुंभार (संता), तो मी नव्हेच (चनक्का, प्रमिला परांजपे, सुनंदा दातार), पंडितराज जगन्नाथ (लवंगिका), पेइंग गेस्ट (सुनंदा), प्रीत राजहंसी (मेहजबीन), बावनखणी (चंद्रा), भटाला दिली ओसरी (नटी), मत्स्यगंधा (सत्यवती), मदनाची मंजिरी, मित्र (नर्स), मी मालक या देहाचा (सिस्टर), वटवट (अनेक भूमिका), वादळवारं (अम्मी), वीज म्हणाली धरतीला (जुलेखा), वेडयाचं घर उन्हात, संत तुकाराम (रंभा), सूर राहू दे, होनाजी बाळा (गुणवती).
Leave a Reply