जोशी, गजानन दत्तात्रय

जोशी, गजानन दत्तात्रय

हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचे पार्ल्यातील भाऊबीज कार्यकर्ते गजानन दत्तात्रय जोशी यांचा सुमारे ३६ वर्षांपूर्वी महर्षी कर्वे यांच्या हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेशी त्यांचा संबंध आला. त्यावेळी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये, संस्थेच्या अतिथी निवासामध्ये, ते सहकुटुंब वास्तव्यास गेले होते. त्या वास्तव्यात या संस्थेशी जुळलेले ऋणानुबंध त्यांनी सख्ख्या भावाप्रमाणे जपले. ते अगदी शेवटपर्यंत. या पहिल्याच वास्तव्यामध्ये, संस्थेच्या भाऊबीज निधी संकलन योजनेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

वयाच्या चोपन्नाव्या वर्षी, हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेशी जोडलेले हे भावाचे नाते, अखेरपर्यंत म्हणजे गेली ३६ वर्षे त्यांनी मन:पूर्वक जपले. पहिल्या वर्षाचा एक हजार रुपयांचा भाऊबीज निधी संकलनाचा आकडा, परिश्रमपूर्वक वाढवित त्यांनी प्रतिवर्षी चार लक्ष रुपयापर्यंत पोहोचविला. आजपर्यंत जोशी यांनी संकलित केलेला भाऊबीज निधी, एक कोटी रुपयापेक्षाही अधिक आहे. स्वत: नि:स्वार्थी बुद्धीने, हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचे काम करीत असतानाच, त्यांनी तीसच्यावर, निधी संकलक स्वयंसेवक कार्यकर्तेही तयार केले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन भाऊबीज निधी संकलन करणार्‍या सहकार्‍यांत स्वत:च्या बहिणी, वहिनी व मुलीचाही सहभाग त्यांना लाभला. विशेष म्हणजे, विलेपार्ल्याला कार्यकतेर् निर्माण झाल्यावर, स्वत: मुंबईच्या इतर भागांमध्ये त्यांनी कार्य करण्यास सुरुवात केली. दरवर्षी, ऑगस्टपासून डिसेंबरपर्यंत, केवळ याच कामासाठी पायाला भिंगरी लावल्यासारखे ते फिरत असत. भाऊबीज निधी जमविण्याकरिता अनेक कुटुंबांतील छोट्या- मोठ्यांना गणितातील तल्लख बुद्धीने ते प्रभावित करीत. २०-३० अंकी कोणत्याही संख्येला ६२५ने गुणून केवळ मिनिटाभरात ते भलेमोठे उत्तर लिहून देत व सर्वांशीच पटकन मित्रत्वाचे नाते जोडीत असत. १९४९ ते १९८१ या कालावधीत, गुडलक नेरोलॅक पेन्टस् या कंपनीमध्ये सचोटीने नोकरी करताना, पूरक उत्पन्नासाठी आयुविर्मा, युनिट ट्रस्ट आदी संस्थांचे गुंतवणूक प्रतिनिधी म्हणूनही ते कार्यरत होते. एकाच कुटुंबातील सलग तीन पिढ्यांना, गुंतवणूक सल्ला मार्गदर्शन व सेवा दिल्याचे ते अभिमानाने सांगत.

व्यावहारिक कुशलता व कुशाग्र बुद्धीच्या जोरावर, पत्नीच्या साथीने त्यांनी अनेक व्यवसाय केले. कधीही न थकता, अविश्रांत मेहनत करणार्‍या कर्मयोग्याची विश्रांतीची व्याख्याच मुळी कामातील बदल ही होती. ‘उत्तुंग’चा अखंड सेवाव्रती पुरस्कार, लोकमान्य सेवा संघातर्फे कार्यरत ज्येष्ठ नागरिक म्हणून गौरव, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानातर्फे गौरव, रोटरी क्लब मुंबईचा व्होकेशनल सविर्स पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी ग. द. जोशी यांना गौरविण्यात आले होते. पांढरे शुभ्र धोतर, पांढरा सदरा, काळी टोपी व निळी कापडी पिशवी असे नुसते वर्णन करताच, अनेकांच्या डोक्यासमोर भाऊबीज निधी संकलनाकरिता दरवर्षी येणार्‍या भाऊ जोशींचे व्यक्तिमत्त्व येते. यावर्षापासून मात्र हे भाऊ, आपल्याकडून भाऊबीज घेऊन जायला कधीच येऊ शकणार नाहीत. मरणोत्तर देहदानाच्या त्यांच्या इच्छेनुसार चेंबूरच्या सोमैया हॉस्पिटल व रिसर्च सेंटरला त्यांचा मृतदेह दान करण्यात आला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*