आपल्या सुरेल स्वरांने आणि अविट गोडीच्या संगीताने मराठी भावगीतांना अनोखी उंची प्राप्त करुन अर्थघन भावगीतांचे नवे युग निर्माण करणार्या गजानन वाटवे यांचा जन्म ८ जून १९१७ या दिवशी झाला.
गजानन वाटवेंनी संगीतबध्द केलेली “मोहुनिया तुजसंगे”,”चंद्रावरती दोन गुलाब”,”दुभंगुनी जाता जाता मी अभंग झालो”,”फांद्यावरी बांधिले गं”,”मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला”,”गगनी उगवला सायंतारा”,”चल चल चंद्रा पसर चांदणे”,”घर दिव्यात तरी”, “यमुनाकाठी ताजमहाल”,”मी निरंजनातील वात”,”रानात सांग कानात आपुले नाते” ही भावगीत आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. तर त्यांच्या आवाजातील “गर्जा जयजयकार”,” नवलाख तळपती दीप “,” नका गडे पुन्हा पुन्हा माझ्याकडे पाहू “,”लाजरीच्या रोपट्याला दृष्ट नका लावू “,”तू असतीस तर झाले असते “,”दोन ध्रुवांवर दोघे आपण “,”राधे तुझा सैल अंबाडा” ही त्यांनी गीतं सुध्दा खूपच प्रसिद्ध आहेत.संगीताची आवड आणि साहित्याचे वाचन या शिदोरीवर त्यांनी त्या काळात नव्याने लोकप्रिय होत असलेल्या भावगीताच्या प्रांतात ऐन तारुण्यात प्रवेश केला आणि पहिल्याच सलामीत ते शतकवीर ठरले. “वारा फोफावला” ही त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे १९३७ साली दिलेली ध्वनिमुद्रिका एवढी गाजली की त्यानंतर त्यांना परत मागे वळून पाहायची गरज वाटली नाही. नाटय़संगीताच्या पाठोपाठ काव्यगायन या प्रकाराला खर्या अर्थाने लोकप्रिय व समृध्द केले ते गजानन वाटवे यांनी संगीत तसंच गायकी क्षेत्रासाठी दिलेल्या भरीव योगदानासाठी गजानान वाटवे यांना “लता मंगेशकर पुरस्कार”, “गदिमा प्रतिष्ठानचा पुरस्कार”, “युगप्रवर्तक पुरस्कार”, “सुशीलस्नेह पुरस्कारा”ने गौरवण्यात आले होते. वाटवेंच्या संगीत प्रवासावर आधारीत त्यांची मुलगी मंजिरी चुणेकर यांनी “गगनी उगवला सायंतारा” हे चरित्र लिहीले आणि उतारवयातही संगीताने वाटव्यांना कायम ताजेतवाने ठेवले. त्यामुळेच रमण रणदिवे, संगीता बर्वे यांच्यासारख्या नव्या पिढीतल्या कवींच्या कवितांना ते सहजपणे सामोरे गेले.
२ एप्रिल २००९ या दिवशी म्हणजेच वयाच्या ९२व्या वर्षी वृध्दापकाळाने पुणे येथील रहात्या घरी गजानन वाटवे यांचे निधन झाले.
गजानन वाटवे यांचे मराठीसृष्टीवरील लेख.
मराठी भावगीतांचे सम्राट – गजाननराव वाटवे(15-Apr-2017)
काव्यनायक गजानन वाटवे(8-Jun-2017)
काव्यनायक गजानन वाटवे(8-Jun-2021)
(लेखन व संशोधन – सागर मालाडकर)
फांद्यावरी बांधियले गाणे केव्हा गायले गेले