दासगणू महाराज यांचा जन्म ०६ जानेवारी १८६८(पौष शुद्ध एकादशी शके १७८९,) रोजी झाला.
सूर्योदयाच्या वेळी जन्म झाला म्हणून बाळाचे नाव “नारायण” ठेवले होते. तथापि बाळ जेव्हा आजोळहून नगरला सहस्रबुद्धे यांच्या घरी आला तेव्हा बाळाचे आजोबा म्हणाले, “याचे कान व पोट गणपती सारखे आहे. आपण याला ‘गणेश’ म्हणू या.” म्हणून ‘गणेश’ हेच नाव रूढ झाले. ‘गणेश’चे पुढे ‘गणू’ झाले. महाराज स्वतःला संतांचा दास म्हणवून घेत असत. म्हणून ‘दासगणू’ हे नामाभिधान प्रचलित झाले.
श्रीसाई भक्तांच्या आग्रहाखातर १९२२ साली शिर्डीत श्रीसाई संस्थान स्थापन झाले व या संस्थानच्या प्रथम अध्यक्ष पदाची जबाबदारी श्रीदासगणू महाराजांवर सोपविण्यात आली. पुढे हे दायित्व दासगणुंनी ३९ वर्षे श्रद्धापूर्वक सेवाभावाने यशस्वीरीत्या सांभाळले.
त्यांनी निर्माण केलेल्या ग्रंथांपैकी अमृतानुभव भावार्थमंजिरी, पासष्टीभावार्थदीपिका, श्रीगुरूचरित्र सारामृत, श्रीगोदा महात्म्य, श्रीगौडपादकारिका, श्रीईशावास्य भावार्थबोधिनी व मंत्रार्थप्रकाशिका, श्रीनागझरी महात्म्य, श्रीनारद-भक्तिसूत्र-बोधिनी, श्रीमध्वविजय, श्रीमांगीशमाहात्म्य, श्रीशनिप्रताप, श्रीशंडिल्यभक्तिसूत्र भावदीपिका हे प्रमुख ग्रंथ त्यांच्या उत्तुंग काव्यप्रतिभेची साक्ष पटवितात. आद्यशंकराचार्यांच्या जीवनावरील रचलेला ओवीबद्ध चरित्रग्रंथ व घराघरात पोहंचलेला, शेगावच्या श्रीगजानन महाराजांच्या लीलाचरित्र वर्णन असलेला ‘श्रीगजाननविजय’ हा ग्रंथ म्हणजे श्रीशारदेच्या स्कंधावर रुळणारी दोन दैदिप्यमान रत्ने आहेत.
२६ नोव्हेंबर १९६२ रोजी श्रीविठ्ठलाने आपल्या या निष्ठावंत भक्ताला पंढरपुरातच स्वतःच्या चरणी विसावा दिला. महाराज पंचतत्वात विलीन झाले.
Leave a Reply