हवाई छायाचित्रण या अनोख्या कलेत देशाच्या पटलावर स्वत:चं अढळ स्थान निर्माण करणारे गोपाळ मधुकर बोधे हे मूळचे सांगली जिल्ह्याचे. छंद म्हणून नव्हे, तर पोटापाण्यासाठी वयाच्या दहाव्या वर्षी हातात कॅमेरा घेतला. १९७२ मध्ये गोपाळ बोधे भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाले. पुढे नौदलाच्या सेवेत मिळालेल्या संधीचे सोने करीत भारतात हवाई छायाचित्रणाची मुहुर्तमेढ रोवली. त्याच दरम्यान निसर्ग व “वाईल्डलाइफ फोटोग्राफी”तही त्यांचे मन रमत होते. पण त्यांनी पूर्ण लक्ष हवाई छायाचित्रणावर केंद्रित केले. हवाई छायाचित्रणाला लोकाश्रय आणि प्रतिष्ठा मिळवून देत असतानाच त्यांनी “इन्फ्रारेड” आणि “पॅरानोमा” छायाचित्रणाचीही सुरुवात केली. विविध व्याख्यानमालांच्या माध्यमांतून बोधे वाइल्डलाइफ व नैसर्गिक संपत्ती यांची माहिती देत. हेलिकॉप्टरमधून त्यांनी टिपलेली देशभरातील “दीपगृहे”,”मुंबईची मनोहारी दृश्ये”,”महाराष्ट्रातील गड-किल्ले” यांचे संकलन आकर्षक कॉफी टेबल पुस्तकांमध्ये करण्यात आले आहे.
नैनितालमधील जिम कॉर्बेट अभयारण्यात हवाई छायाचित्रणासाठी गेले असताना तेथे त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले;पण तातडीने त्यांना नैनिताल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांना फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे, १७ मे २०१४ या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली.
(लेखन व संशोधन – सागर मालाडकर)
फारच छान