भित्ति चित्रण(पोस्टर चित्रण) आणि व्यक्तिचित्रणाकरता नावाजलेले मराठी चित्रकार गोपाळराव बळवंतराव कांबळे ऊर्फ जी कांबळे यांचा जन्म २२ जुलै १९१८ रोजी झाला.
जुन्या काळी चित्रपट ह्या माध्यमाला पूर्णत्वास नेण्यास चित्रकार हा एक महत्वाचा घटक होता. एम.एफ. हुसेन, रघुवीर मुळगांवकर सारखे स्वयंशिक्षित चित्रकार जसे कार्यरत होते, तसेच जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मधून शिक्षण घेतलेले एस. एम. पंडीत चित्रपट सृष्टीसाठी कामे करीत असत.
अशा नावामध्ये एक नांव अग्रणी तळपत होते, आपल्या जादूभरी रंगभोर आविष्काराने सर्वानाच आकर्षीत करीत होते, ते म्हणजे गोपाळ बळवंत कांबळे अथवा ज्यांची सुपारीचीत सही आपणाला नितांत सुंदर अशा बॅनरवर दिसत असे, ते जी. कांबळे या रंगसम्राटाचे !
कोल्हापूर जिल्हा हा तसा कलावंतांची खाणच म्हणायला हरकत नाही. या कलापुरातील भूमीमध्ये कलामहर्षी बाबूराव पेंटर, आबालाल रहमान, गणपतराव वडणगेकर, बाळ गजबर जन्माला आले होते. याच कोल्हापूरात गोपाळरावांचा जन्म एका गरीब खाटीक कुटुंबात झाला. घरात एकूण सात भावंडे.
हंस सिनेमागृहासमोरच रस्त्यावर बसून गोपाळराव समोरील चित्रपटगृहावरील पोस्टर प्रमाणे चित्रे रंगवू लागले. त्यांच्या कलेचा श्रीगणेशा एकूण अश्या प्रकारे सुरु झाला. घरापासून जवळच असलेल्या बाबूराव पेंटर व आबालाल रहमान या दोन मातब्बर कलाकारांचा सहवासही त्या कोवळ्या वयातच त्यांना लाभला.
कोल्हापूरातील कलावंतांची चित्रे ते एकाग्रतेने अवलोकन करीत, एकलव्याप्रमाणे त्यातील कौशल्य स्वतःमध्ये सामावून घेत. लहान वयातच त्यांनी चित्रकलेच्या स्पर्धेत भाग घेतला, आणि त्यांच्या चित्राला बक्षीस मिळाले. त्यावेळी व्ही. शांताराम यांच्या हस्ते गोपाळरावांना चांदीचे पदक देण्यांत आले.
गोपाळरावांना गुरु असा नव्हताच. ते स्वतःच स्वतःचे गुरु होते. न चुकता असंख्य स्केचिस करणे यामुळे त्यांच्या हाताला एक सराव झाला. केवळ ब्रशने ते बाह्यरेषा काढू लागले. यावेळी त्यांनी ब्रिटिश चित्रकार एफ.मटानिया यांच्या चित्रांचा अभ्यास केला. छत्रपती सिनेटोनमध्ये पडदे रंगविण्याची कामे त्यांनी अभ्यासली. व नंतर कोल्हापूर सिनेटोनमध्ये भालजी पेंढारकर यांच्याकडे ते काम करू लागले. खडतर अश्या गरिबीतून उत्कर्षाकडे ती वाटचाल होती. पुढे कोल्हापुरात कांबळे यांच्या महत्वकांक्षेला वाव मिळेल अशी शास्वती त्यांच्या कलासक्त मनाला वाटेना. कारण तेथील मर्यादीत क्षेत्र. डोळ्यापुढे एकच ठिकाण दिसत होते, ते म्हणजे मुंबई.
मुंबईत गोपाळराव कांबळे या कलाकाराच्या जीवनाचा एक नवीन अध्याय सुरु झाला. आरंभीचा काळ खूपच खडतर होता. सिनेमा पोस्टर करण्यासाठी त्यांच्या फिल्म कंपन्यांमध्ये फेऱ्या सुरु झाल्या. आरंभाला फाजलभाईंच्या फिल्म सिटीत, त्यानंतर चंदुलाल शहा यांच्या रणजीत स्टुडीओमधे त्यांना पोस्टर बनविण्याचे काम मिळाले. चंदुलाल शहा हे वर्षाला बारा-बारा चित्रपट काढीत असत. गोपाळरावांना पगार होता महीना पस्तीस रुपये. पण त्यांचे काम चंदुलाल याना एवढे आवडले की त्यांनी गोपाळरावांना पोस्टर विभागाचा प्रमुख बनवून टाकले.
नव्या पिढीला त्यांचा संदेश होता, कोणतीही कला कष्टाशिवाय साध्य होत नाही. तुम्ही तुमची कला मुक्त करा. तीच तुम्हांला यश, कीर्ती मिळवूंन देईल !
गोपाळराव कांबळे यांचे २१ जुलै २००२ रोजी निधन झाले.
Leave a Reply