साठच्या दशकात बॅ. नाथ पै यांच्या विचारांनी गुरूनाथ कुलकर्णी यांना झपाटले होते. त्यामुळे भारावून त्यांनी देवगड तालुक्यात काम सुरू केले. एलएल.बी.च्या शिक्षणासाठी मुंबईत आल्यानंतर साम्यवादी विचारांचे त्यांना आकर्षण वाटले. पण मार्क्सच्या पोथीवादापेक्षा विविध क्षेत्रांतील लोकांत काम करण्याचा त्यांचा पिंड होता. वकिलीची सनद मिळल्यानंतर हायकोर्टात त्यांनी काही काळ वकिली केली. काँग्रेस पक्षात सिंडीकेड-इंडिकेट अशा दोन फळ्या झाल्या तेव्हा इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वास पसंती देऊन, त्यांनी इंडिकेटचे काम करण्याचे ठरविले व १९६९मध्ये ते काँग्रेसच्या सक्रिय राजकारणात आले. विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐरणीवर मांडण्यासाठी एनएसयुआयचा झेंडा हाती घेतला. संघटनाबांधणीचे कौशल्य लक्षात घेऊन, १९७१ साली त्यांच्यावर मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी आली. १९७२च्या भीषण दुष्काळामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील बेकारांचे तांडे मुंबईत यायला लागले. त्यांची गरिबी पाहून त्यांना रोजगार देण्यासाठी त्यांनी काम केले. त्यातूनच ठाण्याच्या हद्दीपर्यंत मर्यादित असलेली ऑटोरिक्षा कुलकर्णी यांनी मुंबईच्या उपनगरात प्रथम आणली. त्यातून अनेकांना रोजगार मिळाला. संजय गांधी यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसचे काम सुरू होते. त्यांचा पाच कलमी कार्यक्रम कुलकर्णी यांनी नेटाने राबविला. त्यामुळे शहर आणि उपनगरात काँग्रेसची संघटनाबांधणी झाली. रेल्वे फलाटावर प्रौढ साक्षरतेचे वर्ग घेणे, गरिबांचा जत्था ताज हॉटेलमध्ये घुसवून दरिदीनारायणाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधणे अशा त्यांच्या आंदोलनाची संसदेला दखल घ्यावी लागली.
शरद पवार यांनी समांतर काँग्रेस स्थापन केल्यानंतर ते पवारांसोबत काम करू लागले. पुलोदच्या काळातही ते त्यांच्याबरोबर होते. काँग्रेसमध्ये हुजरेगिरी, प्रत्येक निर्णयासाठी दिल्लीच्या आदेशाची वाट पाहण्याची प्रथा त्यांना मान्य नव्हती. स्वाभिमानी विचारांसाठी पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी सुरुवातीपासून पक्षसंघटनेची जबाबदारी स्वीकारली ती शेवटपर्यत त्याच निष्ठेने पार पाडली. प्रत्येक विषयाचा दांडगा अभ्यास असलेले कुलकर्णी पक्षाची भूमिका मांडताना ठामपणे बोलायचे. धर्मनिरपेक्षतेबाबत त्यांनी कधीच तडजोड केली नाही. पक्ष कार्यकारिणीत सर्व जातीधर्नामा स्थान मिळावे यावर त्यांचा कटाक्ष होता. २००२ आणि २००८ अशी दोनदा विधान परिषदेवर त्यांची आमदार म्हणून निवड झाली. सत्ताधारी पक्षात असूनही कोकण व जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर त्यांनी आपल्याच सरकारवर कोरडे ओढण्यास मागेपुढे पाहिले नाही. काँग्रेसी राजकारणात चार दशके मुरलेल्या कुलकर्णी यांना हुजरेगिरी मान्य नव्हती. मंत्रीपदाची संधी न मिळाल्याबद्दल त्यांनी कधीच जाहीर त्रागा केला नाही. कोणत्याही विषयावर मालवणी ठसक्यात आक्रमक बोलणारे कुलकर्णी हे प्रेमळ स्वभावाचे होते. म्हणूनच पक्षात ‘गुरुजी’ अशी त्यांची ओळख होती. आजारपणात बरे वाटल्यानंतरही ते राष्ट्रवादीत फेरफटका मारायचे; कारण राजकारण हाच त्यांचा श्वास होता.
Leave a Reply