चित्रपटसृष्टीतील पहिली ग्लॅमरस नायिका म्हणजे हंसा वाडकर. त्यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ रोजी झाला. सौंदर्य, नृत्य आणि अभिनय या तिन्ही आघाड्यांवर परिपूर्ण असणाऱ्या या नायिकेनं दोन दशकं गाजविली.
हंसाबाईंनी आपल्या कारकिर्दीत मोजकेच चित्रपट केले. परंतु, त्यातील त्यांच्या भूमिका आणि पडद्याबाहेरच्या बेफाम वागण्यानं त्या प्रेक्षकांच्या सदैव लक्षात राहिल्या.
हंसाबाईंचं आयुष्य एवढं जबरदस्त होतं की श्यायम बेनेगलांच्या विख्यात दिग्दर्शकाला त्यांच्यावर “भूमिका’सारखा चित्रपट बनविण्याची इच्छा झाली.
हंसाबाईंना अभिनेत्री म्हणून पहिल्यांदा नाव मिळवून दिलं ते “प्रभात’च्या “संत सखू’ चित्रपटानं. या चित्रपटामधील संत सखूची अतिशय सोज्ज्वळ भूमिका हंसाबाईनं मोठ्या ताकदीनं साकारली होती.
या भूमिकेच्या अगदी विपरीत भूमिका त्यांनी व्ही. शांताराम आणि बाबूराव पेंटर यांचं संयुक्त दिग्दर्शन असलेल्या “लोकशाहीर राम जोशी’ या चित्रपटामध्ये साकारली. या चित्रपटात त्यांनी बया या तमासगिरीणीची व्यक्तिरेखा वठवली होती. “…सुंदरा मनामंदी भरली… हवेलीत शिरली… जरा नाही ठरली… मोत्याचा भांग….’ या रामजोशींच्या काव्यानं आणि हंसाबाईंच्या ठसक्याशनं बहार आणली.
त्यांनी “रामशास्त्री’, “धन्यवाद’, “पुढचं पाऊल’, “मी तुळस तुझ्या अंगणी’, “नायकिणीचा सज्जा’, “सांगत्ये ऐका’ यांसारखे मोजकेच चित्रपट केले.
वैयक्तिक आयुष्यातील घसरण आणि कारकीर्द उतरणीला असतानाच त्यांना कर्करोगासारख्या दुर्धर आजारानं गाठलं. या आजाराने त्यांचं पूर्ण खच्चीकरण झालं.
हंसा वाडकर यांचे निधन २३ ऑगस्ट १९७१ रोजी झाले.
Leave a Reply