प्राचीन काळात उत्तर कोकणाची राजधानी असणार्या श्रीस्थानक अर्थात आत्ताच्या ठाणे जिल्ह्याच्या इतिहासाचे संकलन व त्याची माहिती सामान्य माणसाला कळावी, यासाठी हरिभाऊ शेजवळ यांनी मोठा वाटा उचलला आहे. याची प्रेरणा त्यांना त्याचा मोठा मुलगा ज्ञानेश्वर शेजवळ याच्याकडून मिळाली.
ज्ञानेश्वर याला शालेय वयापासूनच ठाण्याचा चित्रमय इतिहास संकलित करण्याचा छंद होता. यामध्ये अनेक दुर्मिळ दस्ताऐवज, चित्र व छायाचित्रांचा समावेश होता. पण दुर्दैवाने ज्ञानेश्वर याचे अपघाती निधन झाले. त्याचे अपूर्ण राहिलेले इतिहास संकलित करण्याचे स्वप्न हरिभाऊंनी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
पेशाने छायाचित्रकार असलेल्या हरिभाऊ शेजवळ यांनी सुरुवातीच्या काळात आर. के. स्टुडिओमध्ये आणि त्यानंतर मेटल बॉक्स कंपनीत छायाचित्रकार म्हणून नोकरी केली. निवृत्तीनंतर हरिभाऊंनी इतिहास संकलनात स्वत:ला पूर्णत: झोकून देत ‘श्री ज्ञानेश्वर इतिहास संशोधन समिती’ स्थापन केली. या समितीच्या माध्यमातून लेखक, इतिहासकार, कलाकार, छायाचित्रकार व चित्रकार मंडळी एकत्र आली. आणि ठाणे परिसरात काढण्यात आलेल्या अनेक दुर्मिळ छायाचित्रांचा खजिना गोळा झाला. पुरातत्व विभाग, ब्रिटिश कौन्सिल, भारतीय रेल्वे, संग्रहालय, ठाण्याचे कारागृह येथून ठाणे जिल्ह्याचे अनेक संदर्भ त्यांना मिळाले. इ.स. ५०० ते इ.स. २००७ पर्यंतच्या ठाण्याच्या इतिहासाची माहिती त्यांना ग्रंथासाठी मिळाली.
ठाण्याच्या संदर्भातील जी काही दुर्मिळ छायाचित्रे किंवा माहिती आपण पाहतो, वाचतो त्यातील बहुतेक हरिभाऊंच्या संग्रहातील आहे. हा ग्रंथ पूर्णत्वास येत असताना अनेक आर्थिक, मानसिक, शारिरीक अडचणी हरिभाऊंच्या खासगी आयुष्यात उद्भवल्या पण दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी मनातील योजनेला मुहुर्तरुप दिले होते.
Leave a Reply