मंगेशकर हे नांव जरी उच्चारलं तरी डोळ्यासमोर एकाहून एक संगीतरत्न असणारी पाचही भावंड उभी राहतात. लता, आशा, उषा, मीना आणि त्यांचे बंधू पंडित हृदयनाथ. पंडित हृदयनाथ यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९३७ सालचा.
आपल्या पित्याकडून म्हणजे दिनानाथांकडून हा संगीताचा वारसा त्यांना लाभला. शास्त्रीय गायनाच्यासाठी त्यांनी अमीरखाँ साहेबांसारख्या गुरुचा गंडा बांधला. संगीत क्षेत्रात निरनिराळे प्रयोग, वेगळ्या वाटेने जाण्याचा अट्टहास आणि अतिशय लाघवी, शब्दार्थाला न्याय देणारी संगीत रचना ही पंडितजींची खासियत. कोळी गीतांना डोलावर डोलायला लावणार्या त्यांच्या चालींनी मराठी मनावर राज्य केलं. शांताबाई शेळक्यांच्या बर्याचा गीतांच्या चाली पंडितजींनी बांधल्या होत्या. ना. धो. महानोर, ग्रेस, आरतीप्रभू इत्यादींच्या कविता किवा गाणी तसेच सुरेश भट यांच्या गझलींना पंडितजींनी दर्जेदार सूर दिले. ‘गेले द्यायचे राहून’, ‘ये रे घना’ अशी त्यांची कितीतरी गीतं ओठावर रेंगाळतात. गायला अतिशय कठीण पण तितक्याच श्रवणीय, मनाचा वेध घेणार्या चाली हे त्यांच्या संगीताचं वैशिष्ट्य.
‘जैत रे जैत’ची गाणी त्यावरील ठेका आणि लोकगीताचा बाज पण एका नव्या प्रयोगातून आलेली रचना पंडितजींच्या सखोल अभ्यासाची यशस्वीताच आहे. ‘लेकीन’ या हिदी चित्रपटाची त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी राजस्थानी ढंगाची लंय घेऊन आपल्यापर्यंत येतात त्यावेळी हृयदनाथांमधील स्वयंभू संगीतकार आपल्याला दिसतो. तसेच उर्दू गझल वाङमयाचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे. अनेक पुरस्कार, ‘सूरसिगारासह’ १९९१ मध्ये त्यांना ‘पंडित’ पदवीने गौरविण्यात आले.
## Pandit Hrudaynath Mangeshkar
Leave a Reply