राजे, कमलाकांत सिताराम

Raje, Kamlakant Sitaram

कमलाकांत सिताराम राजे यांचा जन्म १६ ऑगस्ट १९३०  रोजी   मुंबई येथे झाला. लहानपणापासुनच सुंदर हस्ताक्षर व चित्रकला ह्यासाठी ते शाळेमध्ये (किंगजॉर्ज – दादर) प्रसिद्ध झाले. शाळेमध्ये त्यांना अनेक बक्षिसे मिळत. पुढे ह्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्टस् मध्ये अॅडमिशन घेऊन कमर्शिअल आर्टचा डिप्लोमा मिळवला.

 नंतर शिल्पी अॅडव्हर्टायझिंग कंपनीत आर्ट डायरेक्टर म्हणून नोकरी घेतली. ह्या कंपनीत अनेक आर्टिस्ट त्यांच्या हाताखाली काम करीत असत. सुंदर (क्रिएटिव्ह) जाहिराती करणे तर्‍हेतर्‍हेच्या पद्धतीने हस्ताक्षरे काढून त्या जाहिराती आकर्षक बनवणे ह्याचे मार्गदर्शन हे आर्टिस्टना करुन अनेक बक्षिसे मिळवू लागेल. त्यावेळी रेडिओ व वृत्तपत्रे ह्या पलिकडे काहीही उपलब्ध नसल्याने जाहिरात करणे ही एक कला होती. छपाई ही एकच मोठी संधी असे ! शिल्पी अॅडव्हर्टायझिंग कंपनीस अनेक बक्षीसे (देशी / आंतरदेशीय) मिळत असत म्हणूनच यांची निवड १९७० च्या जपान मधील “एक्सपो ७०” साठी झाली. सुमारे महिना भर ते जपानला (टोकियो, ओसाका) येथे राहिले व अनेक कलाकृती, प्रदर्शने ह्यांचा अभ्यास केला.

जपान मध्ये महागाई खुप असल्याने ह्यांनी अक्षरश: कलिंगडे, फळे खाऊन दिवस घालवले व राहिलेल्या पैशातून कला सामान म्हणजे जपानी छत्र्या, पंखे, खेळणी, बाहूल्या खरेदी केल्या.

१९८४ साली पुन्हा कंपनीने त्यांची निवड जपान येथे आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शन बघण्यास व अभ्यास करण्यास केली. कै. राजे यांनी इंडियन ऑईल, एनजि, मॅक्स फॅक्टर, लिरिल सोप, बॅंक ऑफ बडोदा अशा अनेक जाहिराती केल्या. रिटायरमेंट नंतरही अनेक मासिके, आणि क्लब ह्यांच्याशी निगडीत राहून कलेचा अभ्यास चालूच ठेवला. घरात कलेसंदर्भात विविध प्रयोग करत राहिले. १९९७/९८ मध्ये पूर्ण स्फूर्तीमध्ये चित्रकलेचा मोठा अविष्कार त्यांच्या हातून घडला. राजे यांचे कुलस्वामी श्री. गणेश (गणपती) हा त्यांना प्रसन्न होऊन

श्री गणेशावर १०० च्या वर चित्रे काढून गजाननाला अक्षरश: खेळवला. ह्यात श्री गणेशाचे कोठेही विडंबन नाही. पूर्ण भक्ती व प्रेम ह्यातून ही चित्रे साकारली गेली. पुढे ही इंपोर्टेड क्रेयॉन्सने पेंट (रंगवली) केली.

ह्या चित्रांची अनेक प्रदर्शने त्यांच्या मुलाने डॉ. श्रीकांत राजे याने ठाण्याला भरवली. ह्या प्रदर्शनात चित्रकाराच्या मनातील कल्पना ओळखा व बक्षिस पटकवा असे आव्हान दिले गेले. कारण ह्या चित्रांमध्ये अर्थ पूर्ण भरलेला होता, गंमत होती! चित्रे काढावीत तर ती अशी ज्यात जीव ओतला पाहिजे. कै.राजे यांचे गणेशाभोवती नाचणारे ऊंदिर किंवा बिळात गणेश उत्सव मनवणारे ऊंदिर हे बघून वॉल्टडिस्ने चा मिकी माऊस एकच प्रकारचा व कंटाळवाणा वाटतो !

श्री.गणेशाची रुपे तर्‍हेतर्‍हेने दर्शवून त्यांना मोठी कलाच ऊभी केली. एक चित्र काढण्यास त्यांना १० ते १५ मिनिटेच लागत व रफ वर्क करीत नसत. वयाच्या ६८/६९ वर्षी त्यांच्या हातातील स्थिरता व शक्ती (जोर) हा जबरदस्त होता. चित्रे रंगवण्यास मात्र ते सवडीने वेळ घेत असत.

दुसरा मोठ्ठा प्रयोग म्हणजे कपड्यावरील चित्रे हा त्यांनी केला व अनेक सुंदर कापडे पेंट केली आहेत.

ह्या चित्रकाराचे ४ जुलै २०१० रोजी ठाणे येथे दिड महिन्याच्या आजाराने निधन झाले.

(संदर्भ : राजे परिवाराकडून मिळालेल्या माहितीनुसार)

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*