(१८८७-१९५९)
कोल्हापुर जिल्हयातील कुंभोज गावी (ता. हातकणंगले) एका जैन शेतकरी कुटुंबात भाऊराव पाटील यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रेव्हिन्यू खात्यात लेखनिक म्हणून नोकरीस होते. भाऊरावांना त्यांच्या वडिलांनी कोल्हापुरला शिक्षणासाठी ठेवले. तेथे त्यांच्यावर सत्यशोधक समाजाचे संस्कार झाले. महात्मा फुले, विठठ्ल रामजी शिंदे व मुख्यत्वेकरून शाहू महाराज यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रभाव त्यांच्यावर पडला. परंतु मतभेद झाल्याने त्यांनी कोल्हापुर सोडून सातार्यास विक्रेता म्हणून नोकरी धरली. ही नोकरी करीत असताना त्यांना ग्रामिण भागातील लोकांना शिक्षण मिळाले तर त्यांचे प्रश्न सुटतील हे त्यांच्या लक्षात आले व त्यासाठी १९१९ साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेसाठी त्यांनी पैसे जमा केले. शिक्षणाच्या कार्याला वाहून घेतील अशा सहकार्यांचा संच उभा केला व खेडयापाडयातील लोकांनी त्यांच्या मुलांना शिक्षण घेण्यास पाठवण्यास प्रवृत्त केले. जातीप्रमाणे वसतिगृहे असू नयेत असे भाऊरावांचे मत होते. त्यांचा स्वतःचा जैन वसतिगृहाचा अनुभव वाईट होता. म्हणून सर्व जातीधर्माच्या मुलांना खुली असणारी वसतिगृहे सुरू केली. ब्राह्यणेतर चळवळीतील इतर नेत्याप्रमाणे राष्ट्रवादी चळवळीपासून दूर न रहाता भाऊरावांनी आपल्या परीने त्या चळवळीस हातभार लावला. आयुष्यभर खादी वापरली. पण राजकीय काम करण्याऐवजी रचनात्मक कार्यास वाहून घेतले. १९४२ च्या चळवळीतील भूमिगत क्रांतिकारकांना मदत केली.
त्यांच्या रयत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात शाळा व महाविद्यालयांचे जाळे विणले. या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पुणे विद्यापीठाने त्यांना १९५९ मध्ये सन्माननीय डॉक्टरेट पदवी बहाल केली. त्याच वर्षी त्यांचे पुणे येथे निधन झाले.
Leave a Reply