कौशल इनामदार यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे बालपण मुंबईत गेले आणि शिक्षणही मुंबईतच झाले.
शाळकरी वयात असतानाच प्रसिद्ध संगीतकार कमलाकर भागवत यांच्याकडून संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. रुपारेल महाविद्यालयात शिक्षण घेत असताना तेथे मराठी नाट्यक्षेत्रातील चेतन दातार यांच्याशी त्यांची भेट झाली. दातारांच्या सहकार्याने पुढील काळात ते नाट्यक्षेत्राकडे वळले. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी लिखाण करण्यात संगीत अभ्यास यात स्वतःला व्यग्र करून घेतले.
लहानपणापासून त्यांना संगीताची आवड होतीच. यामागचं एक कारण म्हणजे कौशलचे आजोबा शंकरराव बिनीवाले हे त्या काळातले सुप्रसिध्द व्हायोलिन वादक होते. मुळात शिक्षण इंग्रजी माध्यमात आणि तेही संपूर्णपणे कॉस्मोपॉलिटन वातावरणात. तरीही मराठीची गोडी कायमच होती आणि अभिमानही. मराठीच्या या अभिमानामुळेच त्यांच्याकडून एका अजरामर कलाकृतीची निर्मिती झाली.
एफएम वाहिन्यांवर मराठी संगीत न वाजविण्याचे कारण “मराठी संगीत डाऊनमार्केट” आहे असे वाहिन्याकडून सांगितले गेल्यावर त्यांचा मराठीविषयी अभिमान त्यांना स्वस्थ बसू देईना. आणि त्यानंतर जो घडला तो इतिहासच.
प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असे कवी सुरेश भट यांचे “लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी” हे गीत, आपल्या संगीतातून एक अजरामर कलाकृती म्हणून बनून राहिले. ३ शहरं, १० स्टुडियो, १२ ध्वनिमुद्रक, ६५ वादक कलाकार, ११२ प्रस्थापित गायक, ३५६ समुहगायक आणि २००० लोकांचा सहभाग, त्याचबरोबर जिद्द, अहोरात्र मेहनत, चिकाटी, संगीतावरील आणि भाषेवरील प्रेम यातून निर्माण झालेली ’मराठी अभिमान गीत’ ही त्यांची कलाकृती मराठी माणसाच्या मनाला भिडली आणि या कलाकृतीने मराठी संगीताला डाउनमार्केट समजणार्या एफएम वाहिन्यांना मराठी संगीताची दखल घ्यायला लावली. या उकाच गीतासाठी शंकर महादेवन, हरिहरन यांच्यासाख्या अमराठी भाषिकांसहित अगदी कार्तिकी गायकवाडसारख्या बाल गायकांनाही एकत्र आणण्याचे त्यांचे कसब वाखाणण्याजोगे आहे.
नितीन चंद्रकांत देसाई यांच्या बालगंधर्व आणि अजिंठा या चित्रपटांना त्यांनी दिलेलं काळानुरुप संगीत बरंच गाजलं आहे.
कौशल इनामदार यांनी मराठीच नाहीतर अनेक हिंदी शॉर्ट फिल्मनाही संगीत दिलं आहे. त्यांनी आत्तापर्यंत “बालगंधर्व”, “अजिंठा”, ‘कृष्णा काठची मीरा’, ‘आग’, ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’, ‘अधांतरी’, ‘रास्ता रोको’, ‘इट्स ब्रेकींग न्युज’ आणि ‘हंगामा’ या चित्रपटांना संगीत दिलं आहे. तर ‘शुभ्र कळ्या मूठभर’, ‘रात्र भिजली’, ‘गीतेचा तो साक्षी वदला’, ‘भावांजली’, ‘कामना पूर्ती’, ‘मन पाखराचे होई’, ‘चाफ्याचे शिंपन’ या अल्बमसाठीही संगीत दिलं आहे.
त्यांनी अनेक प्रसिद्ध गायक, संगीतकारांबरोबर काम केलं आहे. त्यात संगीतकार-गायक शंकर महादेवन, पंडीत सत्यशील देशपांडे, साधना सरगम, सुरेश वाडकर, श्रेया घोषाल, महालक्ष्मी अय्यर, रघुनंदन पणशीकर, निनाद कामत, संजीव चिम्मलगी, हमसिका अय्यर, स्वानंद किरकिरे, रविंद्र साठे, शिल्पा पै, सोनाली कर्णिक, शोभा जोशी, आनंद भाटे, हरिहरन आदी अनेक लोकप्रिय कलाकारांचा त्यात समावेश करता येईल.
Leave a Reply