कवी प्रदीप

कवी प्रदीप यांचे खरे नाव रामचंद्र द्विवेदीं. त्यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९१५ रोजी बडनगर येथे झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिमांशु राय आणि देविका रानी यांच्या बाँबे टॉकीजची सूत्रे शशधर मुखर्जींच्या हातात गेली. शशधर मुखर्जी हे प्रतिभा पारखण्यात उस्ताद होते. त्यांनी कवी प्रदीपांना आमंत्रित करून त्यांच्याकडून किस्मत, कंगन, बंधन, झूला आदी चित्रपटांची गीते लिहवून घेतली.

प्रदीप याच्या रचनांत देशभक्ती आणि देशवासीयांमधे जागृती निर्माण करण्याची तळमळ होती. त्यांच्या स्वदेशावरील प्रेमापोटी त्यांनी असंख्य देशभक्तिपर गीते आणि कविता रचल्या. त्या कविता वाचून अनेकजणांचे रक्त उसळत असे. परकीय भारतात त्यांना आपल्या कवितांसाठी सतत अटकेची भीती वाटे. त्यांना अटक टाळण्यासाठी काही वेळा भूमिगत व्हावे लागले होते. कवी प्रदीप यांनी कबीर आणि गालिब यांचे साहित्य वाचले होते. तसेच शैलेंद्र आणि साहिर लुधियानवी यांच्या काव्याशी ते चांगले परिचित होते. पण प्रदीप यांचा पिंड अस्सल भारतीय होता.

भारत-चीन युद्धाच्या सुमारास २६ जानेवारी १९६३ रोजी लता मंगेशकरांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर गायलेल्या त्यांच्या ऐ मेरे वतन के लोगो या गीताने भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांत पाणी आणले होते.

‘दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल’ ये गीत पाकिस्तान्यांना इतके आवडले की पाकिस्तानी चित्रपटात ते, ‘यूं दी हमें आज़ादी कि दुनिया हुई हैरान, ए कायदे आज़म तेरा एहसान है एहसान’ असे रूपांतरित होऊन आले. त्याच प्रकारे, ‘आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिन्दोस्तान की’चे पाकिस्तानात ‘ आओ बच्चो सैर कराएं तुमको पाकिस्तान की’ असे झाले.

१७०० गाणी लिहिणाऱ्या प्रदीप यांना १९९७ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. कवी प्रदीप यांचे ११ डिसेंबर १९९८ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*