कोठावळे, केशवराव

मॅजेस्टिक प्रकाशन या प्रकाशनसंस्थेचा मराठी साहित्य पटलावरती मोठा व आदरयुक्त दबदबा आहे. गुणवत्ता व चोखंदळपणा, यांचप्रमाणे विश्वासार्हता व प्रयोगशीलता या गोष्टींचे अजब रसायन म्हणजे मॅजेस्टिक, हे जणु समीकरणच झाले आहे. या प्रथितयश प्रकाशन संस्थेचे केशवराव कोठावळे हे जनक.

गिरगावच्या फुटपाथवर औदुंबराच्या झाडाखाली एके दिवशी जुन्या पुस्तकांची विक्री करता करता सावरकर लिखित “माझी जन्मठेप” या पुस्तकांच्या प्रतींच्या एक भलामोठा गठ्ठा त्यांच्या हाताला सापडला. त्यांच्या व त्यांच्या संस्थेच्या हा दिवस उज्ज्वल भविष्य घेऊन आला होता, कारण या पुस्तकाला नव्या व अत्यंत आकर्षक वेष्टणात गुंडाळून त्यांनी प्रचंड प्रमाणात विक्री केली होती.

“माझी जन्मठेप”या पुस्तकांमुळे केशवराव कोठावळेंना नवीन ओळख व आयुष्यात पुढे जाण्याची दिशा मिळाली होती. यानंतरच्या काळात जयवंत दळवी, गो. नी. दांडेकरांसारख्या रथी-महारथींचा परिसस्पर्श लाभलेली कित्येक दर्जेदार व संवेदनशील पुस्तके केशवराव कोठावळेंनी आजवर प्रकाशित केली आहेत.

चिकीत्सक व चोखंदळ वाचकांकरिता या संस्थेचे प्रत्येक पुस्तक म्हणजे एखाद्या बौध्दिक मेजवानीसारखे ठरले आहे.

केशवरावांनी आपल्या प्रकाशनसंस्थेच्या नावाला साजेसे असे मिळवलेले यश टिकवणासाठी व त्यावर सुवर्णकळस बांधण्यासाठी त्यांचे सुपुत्र अशोक कोठावळे या संस्थेचा कारभार मोठया कल्पकतेने व कुशलतेनें आज देखील सांभाळताना दिसत आहेत.

दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*