खंडेराव त्र्यंबक सुळे हे त्यांच्या प्रखर देशभक्तीला व समाजवादी विचारसरणीला, आपल्या दर्जेदार लिखाणाद्वारे वाट करून देणारे प्रतिभावंत लेखक व स्वातंत्र्य सेनानी होते. स्वातंत्र्यपूर्वकाळात जन्मलेल्यायाखंडेराव सुळे यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा प्रभाव होता. त्यामुळेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यत व सत्याग्रहांमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता. आपल्या जाज्वल्य देशाभिमानामुळे व समाजवादी मागण्यांसाठी त्यांना अनेकदा तुरूंगात देखील पाठवण्यात आले होते. खंडेराव सुळे यांचे प्राथमिक शिक्षण बी.जे. हायस्कुल ठाणे येथे झाले. पुढे म्हणजेच १९१८ साली उच्च शिक्षणासाठी त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश मिळविला. १९२१ साली महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या गुजरात विद्यापीठामधून त्यांनी विज्ञानविशारद ही पदवी संपादन केली. त्यानंतर “महर्षी अरविंदां”नी सांगितलेल्या आध्यात्मिक मार्गाचा काही काळ मार्गक्रमणा केली. १९३० साली त्यांना केवळ स्वातंत्र्य व समानतेच्या तत्त्वांवर उभा असलेला भारतीय समाज पाहण्याची, त्यासोबतच आपण देशासाठी पाहिलेली स्वप्ने साकार करण्यासाठी कम्युनिस्ट पक्षामध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून प्रवेश केला. सुळे यांच्या प्रखर देशभक्तीची समाजाच्या विविध स्तरांतून ज्याप्रमाणे कौतुक झाले, त्याचप्रमाणे ज्ञान व कला क्षेत्रांमधील त्यांचा व्यासंग व योगदान देखील कधीही न विसरता येण्याजोगे आहे. त्यांना अनेक ज्ञानशाखांत रस होता. संस्कृत, व साहित्य हे त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचे विषय होते. भेदक, चिकित्सक, डौलदार परंतु वास्तवाची धार असलेली परिणामकारक लेखनशैली ही त्यांना मिळालेली नैसर्गिक देणगीच होती. खंडेराव सुळेंनी “शेष” या नावाने ललित लेखन केले, तर “स्कंद” नावाने राजकीय स्वरूपाचे मार्मिक लेखन केले. वीणा मासिकामधून त्यांनी प्रकाशित केलेल्या अनेक लेखांनी गुलामगिरीची झापडे लावलेल्या, भारतामध्ये एकच खळबळ माजवून दिली होती. “ज्योत्स्ना” मासिकातून व इतर नियतकालिकांमधून देखील त्यांच्या अनेक कथा प्रकाशित झाल्या. लेखनासोबतच समीक्षा, हे त्यालाच समांतर असलेले परंतु मनाच्या एका वेगळ्याच विचारशील व संवेदनशील कप्प्याची परीक्षा पाहणारे क्षेत्रदेखील त्यांनी आजन्म आपलेसे केले होते. सुळेंचे कित्येक टीकालेख हे आजही, शुध्द पक्षपातीपणाचे व आभ्यासपुर्ण उत्खननाचे द्योतक मानले जातात. त्यांच्या समीक्षालेखांवर प्रखर मार्क्सवादी तत्व प्रणालीचा प्रभाव दिसून येतो. ख्रिस्तोफर कॉडवेलची सौंदर्य मीमांसा, जनतेचा कवी, बोरिस पॅस्टर नॅक आणि त्याची झिवॅगो इत्यादी प्रसिध्द लेख त्यांच्या मार्मिक व अष्टपैलू वाड्.मयदृष्टीची ग्वाही देतात. १९३८ साली झालेल्या ठाणे जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद खंडेराव सुळेंनी भुषविले होते .
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
ज्योत्स्ना मासिकाच्या पहिल्या अंकात ” कॉम्रेड ” ही पहिली लघुकथा प्रसिद्ध .त्याच वेळी “शेष ” हे टोपणनाव वापरायला सुरवात केली .ज्योत्स्नेतील दुसरी कथा ” विनयभंग . “पातिव्रतेचा शब्द ,गंगारामचा प्रश्न ,एका तरुण वकिलाची दुःखे ,सुवर्णमध्य आदि कथा त्यानी लिहिल्या .वीणा मासिकात त्यानी लिहिलेली “माणूस माणसासारखा वागला “ही कथा बहुचर्चित ठरली .मौजेच्या दिवाळी`अंकातील “देवीचा कोंबडा ” ही त्यांची आवडती कथा होय .ज्योत्स्नेच्या आंतरभारती सदरात त्यांनी तत्कालीन गुजराती लेखकांचा परिचय करून दिला .त्यांच्याबद्दलची इतर विस्तृत माहिती “एका पिढीचे आत्मकथन “( (मुंबई मराठी साहित्य संघ प्रकाशन १९७५ )ह्या पुस्तकात वाचायला मिळेल .