![p-8076-shubha-Khote1](https://www.marathisrushti.com/profiles/wp-content/uploads/sites/2/2017/08/p-8076-shubha-Khote1.jpg)
चित्रपटांची संपूर्ण दुनिया ग्लॅमरभोवती फिरते त्यामुळे अनेकदा पुरस्कारांवर प्रमुख नट-नटय़ांचीच नावे कोरली जातात आणि चरित्र अभिनेते त्यापासून वंचित राहतात. पी. सावळाराम पुरस्कारांमध्ये शुभा खोटेंचे नाव येणे हे त्यामुळे चकित आणि आनंदित करणारे आहे. पावणेदोनशे चित्रपटांमध्ये आणि अनेक टी.व्ही. मालिकांमध्ये तसेच इंग्रजी रंगभूमीवर सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या शुभा खोटे यांच्या अभिनय प्रतिभेचे खरे तर कधीच गांभीर्याने विश्लेषण झाले नाही.
अनेकदा अभिनेते प्रसिद्धीकडे गांभीर्याने पाहत नाहीत आणि प्रसार माध्यमांचेही डोळे कायम प्रमुख अभिनेत्यांकडेच लागलेले असतात. शुभा खोटे यांनी अगदी सुरुवातीला नायिका, सहनायिका म्हणून काही चित्रपट केले; परंतु त्याची कारकीर्द खरी गाजली ती चरित्रनायिका अथवा विनोदी अभिनेत्री म्हणून. किंबहुना विनोदी अभिनेत्यांच्या प्रभावळीत स्वत:चे असे स्वतंत्र स्थान मिळवू शकलेल्या काही मोजक्या अभिनेत्रींमध्ये शुभा खोटेंचे नाव अव्वल क्रमांकावर आहे. क्रीडाक्षेत्रात मनापासून रमत असलेल्या किशोरवयीन शुभा खोटेचे एक छायाचित्र पाहून निर्माता-दिग्दर्शक अमिया चक्रवर्ती यांनी तिला ‘सीमा’ या चित्रपटात भूमिका दिली. १९५५ साली आलेल्या या चित्रपटात शुभा खोटे कॉलेज कन्यका म्हणून सायकल चालविताना दिसल्या. शुभा खोटेंच्या विनोदी शैलीत सांगायचे झाले तर ‘सीमा’नंतर त्यांची अभिनयक्षेत्रातील वाटचाल ‘सायकल’ सारखीच झाली. म्हणजे नायिकेसारखी ‘मोटरगाडी’ची कारकीर्द तिच्या वाटय़ाला आली नाही. अर्थात शुभा खोटेंनी स्वत:ला अगदी सुरुवातीपासूनच वैविध्याची चटक लावली.
‘पेईंग गेस्ट’मध्ये त्यांनी चक्क खलनायिका साकारली होती. परंतु आपली ही व्यक्तिरेखा पडद्यावर पाहण्याची त्यांची स्वत:चीच हिंमत झाली नाही. १९५७ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट शुभा खोटेंनी १९८० नंतर कधीतरी व्हिडीओवर पाहिला म्हणतात. १९५९ साली प्रदर्शित झालेला एल. व्ही. प्रसाद यांचा ‘छोटी बहन’ हा चित्रपट शुभाबाईंच्या अभिनय कारकीर्दीतला खरा ‘टर्निग पॉईंट’ म्हणावा लागेल. मेहमूद, शुभा खोटे आणि धुमाळ ही धमाल ‘तिकडी’ किंवा ‘त्रिकूट’ याच चित्रपटापासून जन्माला आले आणि पुढील जवळपास दोन दशके त्यांनी संगीतमय प्रेमपटांमध्ये धमाल उडविली. शुभा खोटे आणि मेहमूद यांची प्रेमकथा आणि शुभाच्या वडिलांच्या भूमिकेत धुमाळ. धुमाळ सतत या दोघांच्या पाळतीवर, अशी ‘हमखास हास्यकथा’ त्यात असे. ससुराल, दिल एक मंदिर, दिल तेरा दिवाना, भरोसा, जिद्दी अशा अनेक चित्रपटांमध्ये प्रेमाची ही लपवाछपवी रंगली. त्यातूनच ‘मै तेरे प्यार मे क्या क्या न बना दिलवर’ सारखी धमाल गाणी जन्माला आली. चित्रपटाच्या मुख्य कथानकातले ताण-तणाव सुसह्य करण्याचे काम या तिघांनी चोख बजावले.
नर्स, शेजारीण, आई, मैत्रिण, ख्रिश्चन शेजारीण, शाळेची मुख्याध्यापक, मुलींच्या वसतीगृहाची प्रमुख अशा अक्षरश: शेकडो व्यक्तिरेखा शुभा खोटेंनी १९७० नंतरच्या शंभरेक चित्रपटांमधून साकारल्या. परंतु त्यात लक्षात राहिली ती ‘एक दुजे के लिये’मधली ‘सपना’ची अर्थात रती अग्निहोत्रीची प्रेमद्वेष्टी आई. वासूनं पाठवलेली चिठ्ठी सपनाची आई जाळून टाकते, तेव्हा त्या पत्राची राख कॉफीत घालून सपना ती कॉफी पिऊन टाकते. तेव्हा ‘सपनाची आई’ म्हणून शुभा खोटेंनी दिलेला ‘लूक’ केवळ अवर्णनीय म्हणावा लागेल. चित्रपटांमधील भूमिकांचा वेग मंदावल्यावर शुभा खोटेंनी मराठी चित्रपट निर्मितीचाही प्रयत्न करून पाहिला. १९६७ साली ‘चिमुकला पाहुणा’ या मराठी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनही शुभा खोटे यांनी केले. अर्थात एकाच चित्रपटात ही मोहीम थंडावली आणि नंतरच्या काळात शुभा खोटेंनी इंग्रजी रंगभूमीकडे मोर्चा वळविला.
भरत दाभोळकर यांच्या अनेक ‘हिंग्लीश’ नाटकांमध्ये ‘देशी विनोद’ करणाऱ्या व्यक्तिरेखा त्यांच्या वाटय़ाला आल्या. दरम्यानच्या काळात दूरचित्रवाणीवर विनोदी मालिकांचा सुकाळ झाला त्यातही त्यांनी अनेक व्यक्तिरेखा साकारल्या. परंतु गेली काही वर्षे त्या सवयीने आणि सरावाने भूमिका साकार करीत आहेत. आजही शुभा खोटेंचे नाव घेतले की, संगीतमय प्रेमकथांचा हिंदी चित्रपटांचा जमाना डोळ्यांपुढे येतो. धुमाळच्या ‘संरक्षणाखाली’ खोलीत बंद असलेली उपनायिका शुभा खोटे आणि तिच्या वियोगात ‘ऊर बडवीत’, ‘प्यार की आग मे तनबदन जल गया’ म्हणणारा मेहमूद. त्या सर्व मनोरंजक क्षणांसाठी आपण शुभाजींचे ऋणी आहोत!
Leave a Reply