लहू संभाजी खाडे, अर्थात मराठी वगनाट्यांत गाजलेल्या काळू-बाळू जोडीतील काळू यांचा जन्म १६ मे १९३३ या दिवशी झाला होता. लहू खाडेंनी मराठी तमाशा कलावंत, अभिनेते म्हणून आपली छाप रसिक मनांवर उमटवलीच! पण ते स्वत:तमाशा फडाचे मालक होते. घरात तीन पिढ्यांची तमाशा परंपरा होती व तीच परंपरा त्यांनी पुढे सुरू ठेवली.दरवर्षी ठिकठिकाणच्या यात्रा-जत्रांमधून ते तंबू लावून तमाशा फड गाजवायचे. अर्ध शतकाहून अधिक काळ रसिकांवर अधिराज्य गाजविलेल्या या जोडीने तमाशातून अस्पृश्यता, अंधश्रध्दा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातही वगनाट्याद्वारे सतत संदेश देण्याचा प्रयत्न केला.रयत शिक्षणसंस्थेच्या कवलापूर शाखेलाही भरीव आथिर्क मदत केली, इतकेच नव्हे तर मोफत कार्यक्रम देऊन निधी गोळा करण्यास हातभार लावला.“जहरी प्याला” या वगनाट्यामुळे “काळू-बाळू” ही जोडी प्रसिद्धीस आली. या नाटकामध्ये खाड्यांनी त्यांचे जुळे बंधू अंकुश संभाजी खाडे(बाळू) यांच्यासह “काळू-बाळू” नावाच्या पोलिस हवालदारांच्या जोडगोळी रंगवली होती. त्यांच्या या भूमिका महाराष्ट्रभर इतक्या गाजल्या, की ते जोडनाव या दोघा भावंडांचे टोपणनाव बनले. या नाटकाचे पन्नास वर्षात त्यांनी दहा हजारावर प्रयोग केले.
“झालेजिवंत हाडाचा सैतान”,”रक्तात रंगली दिवाळी”,”कोर्टात मला नेऊ नका”,”काळसर्पाचा विषारी विळखा”,”कथा ही दोन प्रेमिकांची”,”इंदिरा काय भानगड ?”,”रक्तात न्हाली अब्रू”,”इश्क पाखरू”,”लग्नात विघ्न”,”सत्ता द्यावी सुनेच्या हाती” ही वगनाट्ये सुध्दा खुपच गाजली.संवादातून विनोदाचे उत्तम सादरीकरण ही त्यांची खासियत होती.त्यांची अदाकारी पहात रसिक पोट धरुन हसत असे.
एकदा तर लहू खाडेंच्या म्हणजेच काळूच्या मुलीचे भाजल्याने निधन झाले. ही बातमी ज्यावेळी त्यांना कळली तेव्हा एका नाट्यप्रयोगात ते व्यस्त होते. तरीसुध्दा दोघांनी
आपले दु:ख बाजूला ठेवून आधी ठरल्याप्रमाणे आपले तमाशा प्रयोग सादर केले.
काळू-बाळू जोडीला तमाशाकलेतील योगदानासाठी १९९९-२००० सालांतील संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन संयुक्तपणे गौरवण्यात आले.७ जुलै २०११ या दिवशी कवलापूर सांगली येथे लहू खाडे यांचे निधन झाले.
Leave a Reply