पेंढारकर, लीलाबाई भालचंद्र

Pendharkar, leelabai Bhalchandra

२४ ऑक्टोबर १९१० रोजी लीला चंद्रगिरी यांचा जन्म झाला. त्याच पुढे लीलाबाई पेंढारकर म्हणून प्रसिद्ध झाल्या.

लीलाबाईंचे बालपण बेळगावात आपल्या आई व मावशी सोबत अतिशय कष्टाचे आणि हालाखीच्या परिस्थितीत गेले; एकदा आंघोळीनंतर केस वाळवत असताना अचानक बाबुराव पेंटरांनी त्यांना पाहिले. लिलाबाईंचा चेहरा त्यांना इतका आवडला की त्यांनी मुकपटात काम करण्यासाठी लिलाबाईंना निमंत्रण दिले; महिलांनी नाटक तसंच चित्रपटांमध्ये काम करण्याचा तो काळ नव्हता, पण अगदी अनपेक्षितरित्या व परिस्थितीमुळे लीलाबाईंना ते धाडस करायला लावले आणि त्यांनी ते केले. अश्या प्रकारे लिला चंद्रगिरींचे रुपेरी पडद्यावर पदार्पण झाले.

१९३० सालच्या प्रभात फिल्म कंपनीच्या “उदयकाल” मुकपटातून लिलाबाई पेंढारकरांनी भुमिका साकारली व त्यानंतर सुरु झालेल्या बोलपट युगातही लीला चंद्रगिरींनी प्रभातच्या “अग्नीकंकण”, “सिंहगड”, “माया मच्छींद्र”मधून भूमिका साकारल्या.बोलपटच्या सुरुवातीच्या काळात काही गाणी देखील लीला चंद्रगिरी यांनी गायली होती.

१९३३ च्या भारतीय चित्रपटसृष्टीतील “सैरंध्री” या पहिल्या रंगीत चित्रपटाच्या नायिका होण्याचा बहुमान देखील लीलाबाई पेंढारकर यांना मिळाला. त्यानंतर लीलाबाई भालजींच्या चित्रपटांकडे वळल्या. भालजींच्या “महारथी कर्ण” व “वाल्मिकी” या सिनेमातून भूमिका साकारत असतानाच त्यांचे प्रेम जुळले आणि त्याचे रुपांतर विवाहत झाले व लीला चंद्रगिरीच्या त्या लीला पेंढारकर झाल्या.

१९३४ चा “आकाशवाणी” हा त्यांचा भालजी पेंढारकरांसोबतचा पहिला चित्रपट. कालांतराने लीलाबाईंनी त्यांच्या चित्रपटातून भुमिका करणे पसंत केले. ते चित्रपट म्हणजे “कालियामर्दन”, “सावित्री”, “कान्होपात्रा”, “गोरखनाथ”, “भक्तदामाजी”, “सुवर्णभूमी”, “छत्रपती शिवाजी”, “राजा गोपीचंद” आणि “गनिमी कावा”. “छत्रपती शिवाजी” मधून राजामाता जिजाबाईंची भूमिका अजरामर करणार्‍या अभिनेत्री लीला पेढारकरांच्या नावाला कलेच्या विश्वात अनोखे वलय प्राप्त झाले. त्यासोबच सावित्री चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली. गरोदर असतानाही चित्रपटासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीला तोड नाही;या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्यांच्या पोटाला, कमरेला बांधलेल्या दोरीचा परिणाम, पोटातल्या बाळावर देखील झाला होता. आणि लीलाबाईंच्या मुलाचा जन्म झाला तो व्यंग होऊनच! “गनिमी कावा” हा लीलाबाई पेंढारकर यांच्या रुपेरी कारकीर्दीतला शेवटचा चित्रपट होता.

अभिनयाबद्दल लीलाताई पेंढारकर यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा “चित्रभूषण पुरस्कार” , “महाराष्ट्र गौरव पुरस्कार”, “जिजाऊ पुरस्कार”, तसंच मुंबईच्या भारतीय विद्याभवन संस्थेच्या कला केंद्राच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

लीलाबाईं पेंढाकरांनी वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षी आपले बालपणापासून ते उतारवयापर्यंतचे जीवनानुभव, चित्रसृष्टीतला प्रवास “माझी जीवनयात्रा” या आत्मचरित्राच्या माध्यमातून शब्दबध्द केला आहे.

(लेखन व संशोधन – सागर मालाडकर)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*