विदर्भाच्या सामाजिक, राजकीय, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक जीवनातील एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे.
ह्यांचा जन्म २९ ऑगस्ट १८८० साली झाला. त्यांच्या घराण्याचे मूळ नाव वणी. त्यांचे आजोबा हे वैदिकी होते. त्याचे लहानपणापासूनच संस्कार अणे यांच्यावर झाले. नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून १९०२ साली ते बी. ए. झाले. त्यानंतर एल. एलबी. ची पदवी १९०७ साली त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून मिळविली. एल. एलबी. ची पदवी मिळाल्यानंतर विदर्भातील यवतमाळ येथे ते वकिलीचा व्यवसाय करू लागले.
स्वातंत्र्य चळवळीच्या वातावरणाने भारावून लोकमान्य टिळकांना गुरु मानून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. टिळकांच्या राजकीय चळवळीत त्यांना मानाचे असे अग्रस्थान होते. त्यावेळेला ‘विदर्भाचे लोकनायक’ असे त्यांना संबोधण्यात येऊ लागले. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या चळवळीत त्यांचा मनःपूर्वक सहभाग होता. पुढे काँग्रेसमध्ये त्यांचे न पटल्याने ते या चळवळींपासून अलिप्त झाले.
इंग्रज राजवटीत व्हॉईसरॉयच्या सल्लागार मंडळाचे सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. सिलोनमध्ये भारताचे हायकमिशनर आणि स्वतंत्र भारतात बिहारचे राज्यपाल ही दोन्ही मानाची पदे त्यांनी भूषविली.
संपूर्ण आयुष्यच त्यांनी देशहिताच्या कार्यासाठी वेचले. त्यामुळे भारत सरकारकडून पद्मविभूषण हा किताब देऊन त्यांना गौरविण्यात आले.
लोकनायक अणे या व्यक्तिमत्त्वाची दुसरी बाजू ज्ञानोपासकाची आहे. लोकजागृती करणारे लेख ‘लोकमत’ आणि यवतमाळच्या ‘हरिकिशोर’ साप्ताहिकातून त्यांनी लिहिले. प्राच्यवाङ्मयाचा त्यांचा व्यासंग अतिशय सखोल होता. तत्त्वज्ञान, इतिहास, धर्म आणि साहित्य हे त्यांचे वैचारिक चितनाचे विषय होते. या विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. ‘लोकनायक अणे ह्यांचे लेख व भाषण’, ‘अक्षरमाधव’ या त्यांच्या लेखसंग्रहात तसेच त्यांच्या लेखांतून आणि प्रस्तावनेतून लोकनायकांच्या व्यासंगाचा आणि विश्लेषक बुद्धीचा प्रत्यय येतो.
लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित त्रिखंडात्मक श्लोकबद्ध संस्कृत काव्य ‘श्रीतिलकयशोर्णव’ त्यांनी रचले. या त्यांच्या काव्याला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला. १९२८ साली ग्वाल्हेर येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या तेराव्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदाचा मानही त्यांना मिळाला होता.२६ जानेवारी १९६८ साली त्यांचे निधन झाले.
Leave a Reply